गोदावरीचे कालवे झाले वाहतेे

0
रब्बीचे पहिले आवर्तन, जलद कालव्याला आज पाणी सुटणार

अस्तगाव (वार्ताहर) – रब्बी हंगामाचे सिंचनाचे पहिले आवर्तन रविवारी रात्री 9 वाजता सुटले. त्यामुळे गोदावरीचे दोन्ही कालवे वाहते झाले आहेत. पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचे आवर्तन करण्यात येणार आहे. त्यानंतर सिंचनाचे आवर्तन सुरू होणार आहे.

गोदावरीचा कोपरगावच्या दिशेने वाहणारा डावा कालवा नांदूर मधमेश्‍वर बंधार्‍यातून शनिवारी दुपारी 3 वाजता 150 क्युसेकने सोडण्यात आला आहे. या कालव्याचे पाणी कोपरगावात पोहचले आहे. या कालव्यातून 200 क्युसेकने पाणी सध्या सोडण्यात येत आहे. तर राहाता तालुक्यातून वाहणारा उजवा कालवा रविवारी रात्री 9 वाजता सोडण्यात आला. सुरुवातीला या कालव्यातून 300 क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

सोमवारी सकाळी 400 क्युसेक इतका करण्यात आला. उजव्याचे पाणी बुधवारी सकाळी राहाता, अस्तगाव परिसरात दाखल होईल. या कालव्यांद्वारे टेल टू हेड पाणी देण्यात येणार आहे. सुरुवातीला चार पाच दिवस पिण्याच्या पाण्याचे आवर्तन देण्यात येणार आहे. मागील आवर्तन 15 ऑक्टोबरला देण्यात आले होते. दीड महिन्यानंतर पुन्हा पिण्याचे पाणी देण्यात आल्याने कोपरगाव तसेच पुणतांबा वगळता अन्य तलावांत काही स्वरुपात पाणी आहे.

त्यामुळे पिण्याचे पाण्याचे आवर्तन लवकर उरकणार आहे. त्यानंतर लगेचच सिंचनाचे आवर्तन घेण्यात येणार आहे. उजव्या कालव्यावर 3300 ते 3400 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची मागणी आहे. तर डाव्यावर 3100 हेक्टरची मागणी आहे. साधरणत: दीड महिना चालणार्‍या या आवर्तनासाठी 2.5 टीएमसी पाणी लागणार आहे.

डावा कालवा सोडतेवेळी नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यात 243 दलघफू पाणी होते. त्यानंतर रविवारी दुपारी 4 वाजता मुकणे धरणातून 500 क्युसेकने तर सोमवारी सकाळी 6 वाजता दारणातून 550 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. वैजापूर, गंगापूरच्या दिशेने जाणारा जलद कालवा मंगळवारी सुटण्याची शक्यता आहे. या कालव्याची सिंचनाची मागणी आली की लगेच हा कालवा सोडला जाणार आहे. त्यामुळे वरील धरणांतील विसर्ग वाढणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*