गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा!

0
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह तीन मंत्री आजारपणामुळे  राज्यात अनुपस्थित असल्याने  मागील सहा महिन्यांपासून गोव्यातील प्रशासन कोलमडले आहे. सदर बाब अत्यंत गंभीर असून काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी काँग्रेस भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

गोव्याचे प्रशासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि अन्य दोन आजारी मंत्री ऊर्जामंत्री पांडुरंग मडकईकर व शहर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे नेतृत्वहीन झाले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर याना उपचारासाठी सतत परदेशी जावे लागते. तरी त्यांनी आपला प्रभार दुसऱ्याकडे सोपवलेला नाही. मडकईकर आणि डिसोझा हे दोन मंत्री राज्याच्या कारभारात कधी परतणार हे निश्चित नाही. अशा स्थितीत प्रशासन चालवायचे कुणी, असा सवाल करून खलप म्हणाले, राज्य शासन संवैधानिक संकटात सापडले असून प्रशासन चालविण्यासाठी गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेस राज्यपालांकडे करणार आहे. अशा स्थितीत राज्यपालांनी याप्रकरणी हस्तक्षेप करायला हवा, असेही खलप यांनी सांगितले.

….स्वताच्या मंत्र्यांवर विश्वास नाही

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अ‍ॅड. यतिश नाईक म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी  ताबा अन्य मंत्र्यांकडे न देणे याचा अर्थ त्यांचा त्यांच्याच मंत्र्यांवर विश्‍वास नाही, असा होतो. राज्य सरकार अस्तित्वात नसून जनतेला गृहीत धरले जाऊ शकत नाही. राज्यपालांनी मौन का बाळगले आहे, असा सवालही त्यांनी केला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे नेते विजय पै उपस्थित होते.

आजारी मंत्रीमंडळ 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर याच वर्षी मार्च ते जून या कालावधीत उपचारासाठी अमेरिकेत गेले होते. ते पुन्हा 10 ऑगस्टला अमेरिकेला गेले आणि 22 ऑगस्टला मायदेशी परतले. आता पुन्हा ते उपचारासाठी अमेरिकेला गेले असून 8 सप्टेंबरला देशात परतणार आहेत. ऊर्जामंत्री मडकईकर यांच्यावरही 5 जूनपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरविकासमंत्री डिसोझा हेही मागील महिन्यात उपचारासाठी अमेरिकेला गेले आहेत.

LEAVE A REPLY

*