टोळक्याच्या हल्यात चष्माविक्रेत्याचा खून

नातेवाईकांचा जिल्हा रूाग्णालयात गोंधळ

0
नाशिक | दि. १३ प्रतिनिधी -त्र्यंकेश्‍वर रोडवर गॉगल खरेदीच्या वादातून तीन दिवसांपूर्वी दुचाकीस्वार टोळक्याने केलेल्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या चष्मा विक्रेत्याचा आज मृत्यु झाला. पोलीसांनी संशयीतांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हारूग्णालयात जमलेल्या शेकडो नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत आरोपींच्या अटकेची मागणी केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

ऐतेशाम इरशाद अन्सारी (२३ रा.मेहबुबनगर, वडाळारोड, मुळ उत्तर प्रदेश) असे टोळक्याच्या हल्यात मृत्यु झालेल्या चष्मा विक्रेत्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि.१०) दुपारी चार वाजेच्या सुमारास ऐतेशाम अन्सारी त्रंबक रोडवरील वेद मंदिराजवळ गॉगल विक्री करीत होता.

त्याने रस्त्यावर स्टॉल लावून गॉगल विक्री करीत असतांना सायंकाळच्या सुमारास चार ते पाच दुचाकींवर आलेल्या टोळक्याने आपली वाहने थांबवून त्याच्याकडून चष्मे घेण्याचा बहाणा केला. यावेळी पाच ते सहा जणांनी गॉगल घेतले परंतू त्याचे पैसे दिले नाहीत. विक्रेता अन्सारी याने टोळक्याकडे पैश्यांची मागणी करताच युवकांनी त्यास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.

तसेच त्यातील दोघांनी चाकूने त्यावर वार केले. या घटनेत वर्मी मार लागल्याने अन्सारी जागीच रक्ताच्या थारोळयात बेशुध्द पडला. परिसरातील नागरीकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यास जिल्हारूग्णालात दाखल केले होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नातेवाईकांनी त्यास अधिक उपचारार्थ खासगी रूग्णालयात दाखल केले होते. त्यावर उपचार सुरू असता आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला.

ऐतेशाम याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि मुस्लिम बांधवानी जिल्हारूग्णालयात एकच गर्दी करत घोषणाबाजी केली. घटनेला तीन दिवस उलटूनही मारेकरी कोण याचा उलगडा पोलिस करू शकले नसल्याने नातेवाईकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरल्याने काही काळ रूग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता.

सहाय्यक आयुक्त डॉ.राजू भुजबळ यांनी आपल्या फौजफाट्यासह धाव घेत नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांच्या वतीने पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले. त्यात हल्लेखोरांना तात्काळ पकडून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. डॉ. भुजबळ यांनी हल्लेखोरांविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात येवून त्यांना तात्काळ अटक करण्यात येईल अशी ग्वाही दिल्यानंतर घटनेवर नातेवाईकांनी माघार घेतली. मुंबईनाका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टवाळखोरीचा बळी
मूळचा उत्तरप्रदेश येथील रहिवासी असलेला ऐतेशाम अन्सारी हा गेल्या दीड वर्षापासून वडाळा रोड परिसरात वास्तव्यास होता. शहरात विविध ठिकाणी चष्मा विक्रीचा व्यवसाय करून तो कुटूबाचा उदनिर्वाह करीत होता. रमजानचा महिना असल्याने त्याने रोजा केला आहे. अशातच टवाळखोरांनी किरकोळ चष्म्यांच्या पैशांवरून त्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्या पश्‍च्यात पत्नी, आई-वडील आणि सहा महिन्याची मुलगी असा परिवार आहे. त्याच्या मृत्युने शहरभर हळहळ व्यक्त होत आहे. ऐतेशाम टवाळखोरीचा बळी ठरला असून पोलीसांना हे रोखण्यात पुर्ण अपयश आल्याचे आरोप नागरीक करत आहेत.

LEAVE A REPLY

*