घोटणच्या शेतकर्‍यांची दिंडी आज मुंबईत : मुुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करणार आंदोलन

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतकर्‍यांच्या उसाला भाव मिळावा, यासाठी शेवगाव तालुक्यातील घोटण येथे गेल्या आठवड्यात आंदोलन झाले. यावेळी पोलिसांनी शेतकर्‍यांवर गोळीबार केला. यात दोन शेतकरी जखमी झाले आहेत. याप्रकरणी बंदोबस्तासाठी असणारे पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकरी महासंघाच्यावीने करण्यात आली. यासाठी बुधवारी दुपारी 3 वाजता घोटण (ता. शेवगाव) ते मुंबई दिंडी रवाना झाली असून गुरुवारी (आज) सकाळी 11 वाजता मुंबईत मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
घोटण व खानापूर (ता. शेवगाव) या भागात शेतकर्‍यांनी उसाला भाव मिळावा यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. हा गोळीबार करताना पोलिसांनी शेतकर्‍यांच्या पायवर गोळ्या झाडण्याऐवजी त्यांच्या छातीवर गोळ्या झाल्या. यात दोन शेतकरी जखमी झाले.
त्यानंतर पोलिसांनी या भागात शेतकरी आणि महिलांना पोलीसांनी घरात घुसून मारहाण केलेली आहे.
पोलीसांचा हा प्रकार दडपशाहीचा असून पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे. यामुळे या प्रकराची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, जखमी शेतकर्‍यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत मिळावी, यासह अन्य मागण्यासाठी आज शेतकरी महासंघ आंदोलन करणार असल्याचे संभाजी दहातोंडे यांनी सांगितले. घोटण ते मुंबई दिंडीत दहातोंडे यांच्या समवेत शेकडो शेतकरी वाहनाद्वारे मुंबईकडे रवाना झाले असून नवी मुंबईत हे शेतकरी मुक्काम करून सकाळी मुंबई दाखल होणार आहे.

LEAVE A REPLY

*