‘त्या’ ग्रामसेवकांवर फौजदारी दाखल होणार

0
नाशिक । सिन्नर तालुक्यातील घोरवड ग्रामपंचायतीत सरंपचांची खोटी सही करून अडीच लाखांचा अपहार केल्याप्रकरणी ग्रामसेवक विलास कवडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

त्यांची चौकशी पूर्ण झाली असून अहवाल प्राप्त होताच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडून पैसे वसुली केली जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र पाटील यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या नुकताच झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्य निलेश केदार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. सिन्नर तालुक्यातील घोरवड ग्रामपंचायती अंतर्गत 13 व्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या अंगणवाडीसह अन्य बांधकामांचे मूल्यांकन सादर न केला नाही.

या प्रकरणात सकृतदर्शनी दोन लाख 67 हजारांचा अपहार केल्याचा ठपका ग्रामसेवक कवडे यांच्यावर जि.प. ग्रामपंचायत विभागाने ठेवला होता. या प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने कारवाई करत मे 2017 मध्ये कवडे यांना निलंबित केलेले आहे.

ग्रामपंचायतींचे दप्तर मागवून न देणे, सरपंचाच्या खोट्या स्वाक्षरी करून रक्कम परस्पर काढणे, एकाच स्वाक्षरीने बँकेचे व्यवहार करणे आदी ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. 4 जानेवारी 2017 च्या ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार संबंधित ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी सिन्नरच्या गटविकास अधिकार्‍यांनी जि.प. ग्रामपंचायतीला पत्र दिले होते.

त्यावर अद्यापही कारवाई झालेली नसल्याचा मुद्दा केदार यांनी यावेळी उपस्थित केला. याबाबत, संबंधित विभागाने उत्तर देण्याची मागणीही त्यांनी केली. संबंधित ग्रामसेवक कवडे यांची चौकशी केली असता त्यात दोषी आढळले आहेत. त्यांचे निलंबन करण्यात आलेले आहे.

तसेच त्यांच्या कारवाईबाबत सिन्नर गटविकास अधिकार्‍यांना दोन वेळा पत्र दिलेले आहे. गटविकास अधिकार्‍यांचा अंतिम अहवाल प्राप्त झाला की, ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडून आर्थिक वसुली केली जाणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

*