Friday, April 26, 2024
Homeनगरघाटघर 116, रतनवाडीत 119 मिमी पावसाची नोंद

घाटघर 116, रतनवाडीत 119 मिमी पावसाची नोंद

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात बुधवारी मुसळधार पाऊस सुरू असल्याने काल सकाळी संपलेल्या 12 तासांत 70 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. घाटघर व रतनवाडीत 4 इंचापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. आवर्तन सुरू असल्याने 70 दलघफू पाणी खर्ची झाले. कालही पावसाचा जोर टिकून असल्याने आवक वाढणार असून पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.

- Advertisement -

भंडारदरा, घाटघर आणि रतनवाडीत गत चार दिवसांपासून मान्सून सक्रिय आहे. कमी अधिक प्रमाणात सरी कोसळत होत्या. पण काल कोकणकडा, कळसूबाई शिखर, घाटघर, रतनवाडी आणि पांजरेत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे पांजरे, नेकलेस व अन्य धबधबे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत. भंडारदरा परिसरात काल दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 23 मिमी झाली आहे.

11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 5236 दलघफू होता. निळवंडे धरणातही पाण्याची आवक होत आहे. वाकी तलावातील पाणीसाठा वाढू लागला असून हा तलावातील पाणीसाठा येत्या एक दोन दिवसांत निम्मा होण्याची शक्यता आहे. 112 दलघफू क्षमतेच्या या तलावात काल सायंकाळी 46.23 दलघफू पाणीसाठा होता. पावसाचे प्रमाण वाढल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे पाणलोटात शेती कामांनी वेग घेतला आहे.

काल सकाळपर्यंत संपलेल्या 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस असा- (मिमी) भंडारदरा 89, घाटघर 116, पांजरे 101, रतनवाडी 119, वाकी 69.

- Advertisment -

ताज्या बातम्या