सार्वमतचे ‘जीनियस’ ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रेरणादायी : आ. थोरात

0

शैक्षणिक प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद : आज सांगता

संगमनेर (प्रतिनिधी) : दैनिक सार्वमतने जीनियस एज्युकेशन फेअरचे आयोजन करुन एक स्तुत्य उपक्रमास सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळणार आहे. ग्रामीण भागात शिक्षणाबाबत मार्गदर्शनाची नवी संधी या व्यासपीठामुळे उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

दैनिक सार्वमत आयोजित अमृतवाहिनी शिक्षण संस्था, एसएमबीटी संस्था व संजीवणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट प्रायोजित जीनियस एज्युकेशन फेअर 2017 चे उद्घाटन गुरुवारी सकाळी 11.30 वाजता येथील मालपाणी लॉन्सवर मान्यवरांच्या उपस्थित झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे होते.

व्यासपीठावर शिक्षणतज्ज्ञ तथा शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे संचालक सुमित कोल्हे, जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, सरव्यवस्थापक हरी यादव, अमृतवाहिनी कॉलेजचे प्राचार्य व्ही. बी. धुमाळ आदि मान्यवर उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, 12 वीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होत असतात. स्व. वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असतांना त्यांनी राज्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी हे हेतूने इंजिनिअरींग व मेडीकल कॉलेजला मान्यता दिली. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली.

आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, दैनिक सार्वमत हा प्रत्येक वाचकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. सार्वमत न वाचल्यास चुकल्यासारखे वाटते. जीनियस एज्युकेशन फेअरमध्ये नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. शिक्षण हे आता अर्थशास्त्र बनू पाहत आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. देश महासत्तेकडे वाटचाल करत असतांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पारंपारिक कोर्सेस माहित असतात. मात्र नवीन कोर्सेसची माहिती नसते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात गेल्यानंतर त्यांचे अधःपतन होत असते. शहरी महाविद्यालयांप्रमाणेच ग्रामीण भागातही आता महाविद्यालयांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम सुरु केले आहे.

ग्रामीण भागातील शिक्षण महत्वाचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सार्वमतने चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे. या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करावे, असे आवाहन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

शहरी भागापेक्षाही ग्रामीण भागात उत्तम दर्जाचे शिक्षण मिळू लागले आहे. ग्रामीण भागातील शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून नवीन संधी उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे शहरी भागातील शिक्षण संस्थापेक्षा ग्रामीण शिक्षण संस्था वरचढ ठरत आहे. दैनिक सार्वमतने आयोजित केलेल्या जीनियस एज्युकेशन फेअरमध्ये विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणार असल्याचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे संचालक सुमित कोल्हे म्हणाले.

कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दहावी, बारावी नंतर पुढे काय? जीनियस एज्युकेशन फेअरमधून या विद्यार्थ्यांना प्रश्‍नाचे उत्तर शोधता येणार आहे. ‘जीनियस’ शैक्षणिक चर्चेचे व्यासपीठ ठरले आहे. या उपक्रमाने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी शोधण्याचा मार्ग निर्माण केला असून विद्यार्थ्यांचा यात सक्रीय सहभाग अपेक्षित आहे.

मान्यवरांचे स्वागत उपसंपादक गणेश भोर, उपसंपादक अमोल वैद्य, संगमनेर तालुका प्रतिनिधी सोमनाथ काळे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलला भेट देवून विविध अभ्यासक्रमांची माहिती घेतली. सूत्रसंचालन जाहिरात व्यवस्थापक रविंद्र देशपांडे व मार्केटींग अधिकारी अमित नेहरकर यांनी तर उपस्थितांचे आभार जाहिरात व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे यांनी मानले. गुरुवारी दिवसभरात शहरातील विविध विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एज्युकेशन फेअरला भेट देवून समाधान व्यक्त केले.

यावेळी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अमृतवाहिनी इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मॉडेल स्कुलचे प्राचार्य केशवराव जाधव, एम. बी. ए. चे प्राचार्य बाबासाहेब लोंडे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. चव्हाण, डी. फार्मसीचे प्राचार्य शिरभाते, इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्या शेट्टी मॅडम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे रजिस्टार बाबुराव गवांदे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बी. के. शिंदे, प्रा. नामदेव कहांडळ, सह्याद्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर, उपप्राचार्य उगले, श्रमिक ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य अजित शेलार, प्रा. डॉ. किशोर डोंगरे, संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोधीपक्षनेते सरुनाथ उंबरकर, गंगाधर शिंदे, राजेश आसोपा, शकील शेख, शरद ढमक, जिजाबा हासे, संजय गोपाळे, प्रा. दिघे आदि उपस्थित होते.

 

संगमनेरमध्ये प्रथमच दैनिक सार्वमतने जीनियस एज्युकेशन फेअरचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भविष्यात कुठले शिक्षण घ्यावे यासाठी विविध पर्याय येथे उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील अग्रेसर शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या एज्युकेशन फेअरला जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी व आपले करीअर निवडावे.
-कु. प्रतिमा फापाळे, श्रमिक ज्युनि. कॉलेज, संगमनेर

दैनिक सार्वमत आयोजित जीनीयस एज्युकेशन फेअर 2017 हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे ठरले असून यामुळे ग्रामीण भागातील 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना करीअर निवडण्यासाठी कोण-कोणत्या संधी उपलब्ध आहेत, व त्या कशा प्रकारे घेता येतील, याविषयाची सखोल माहिती या प्रदर्शनात मुलांना झाली असून शिक्षणामधील वेगवेगळ्या दिशा कशा असाव्यात व आपले ध्येय साध्य करण्यासाठी करिअरमध्ये योग्य दिशा निवडणे किती महत्वाचे असते आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन अतिशय महत्वाचे ठरते, याची प्रचिती यावेळी विद्यार्थ्यांना आली.
-प्रा. भाऊसाहेब शिंदे, उपप्राचार्य, सह्याद्री व्हॅली कॉलेज
आफॅ इंजिनिअरींग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, राजुरी ,पुणे

LEAVE A REPLY

*