Friday, May 3, 2024
Homeनाशिकमहासभेत अतिक्रमणावरून गोंधळ

महासभेत अतिक्रमणावरून गोंधळ

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मनपाच्या करोना उपचार रूग्णालयांमध्ये सुविधांचा अभाव तसेच अतिक्रमणाला सत्तारूढ गटातर्फे प्रोत्साहन दिले जात असल्याच्या मुद्यावर महासभेत गोंधळ उडाला.

- Advertisement -

एमआयएम गटनेते डॉ. खालीद परवेज व माजी उपमहापौर युनूस ईसा यांनी थेट ऑनलाईन महासभा हॉलमध्ये प्रवेश करत महापौरांना धारेवर धरले.

यावेळी महापौरांची खुर्ची ताब्यात घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला. शाब्दीक चकमकीसह गोंधळातच विविध विषयांना मंजुरी दिली गेली.

मनपाची मासिक महासभा ऑनलाईनव्दारे घेण्यात आली. महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली सभेस प्रारंभ झाला. उपायुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव पंकज सोनवणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

घरकुल लाभार्थींना सुलभ हफ्त्यात रक्कम भरण्याची सवलत तसेच आयेशानगर भागातील स्विपर कॉलनीचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मनपास शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. या ऑनलाईन महासभेत देखील तांत्रिक अडचणीमुळे ऐकू येत नसल्यामुळे गोंधळ उडाला.

डॉ. खालीद परवेज यांनी अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी थेट सभागृह गाठत महापौरांना जाब विचारला. सदरचे अतिक्रमण काढले जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. मात्र परस्पर विषय मंजूर केले जात असल्याचा आरोप युनूस ईसा, डॉ. खालीद परवेज व माजीद शेख यांनी केल्याने महापौरांनी त्यांचे म्हणणे फेटाळून लावल्याने गोंधळ उडाला.

दरम्यान, ऑनलाईन महासभेमुळे सत्तारूढ गट मनमानी कारभार करत असून बहुमताच्या जोरावर अतिक्रमणाला प्रोत्साहन देण्यासारखे विषय मंजूर करत आहे. करोना उपचार केंद्रात सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे, असा आरोप स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेज यांनी केला

तर जिवनदायी योजनेत समाविष्ट खाजगी रूग्णालय करोना बाधितांवर उपचार करत नसल्याचा आरोप भाजप गटनेते सुनिल गायकवाड यांनी करत संबंधित रूग्णालयांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली. उपायुक्त नितीन कापडणीस यांनी रूग्णालयातील त्रुटींसह शासन नियमांची माहिती दिली. मात्र नगरसेवकांचे समाधान झाले नाही. गोंधळातच महासभेतील विषय मंजूर केले गेले.

महापौरांची पोलीस ठाण्यात तक्रार

महासभेत अतिक्रमण काढले जाणार असल्याचे स्पष्ट केले असतांना देखील अंगावर मारण्यासाठी धावून येणे तसेच महासभेच्या कामकाजात नियम पायदळी तुडवून अडथळा आणणे व अवमान केल्याप्रकरणी महापौर ताहेरा शेख यांनी एमआयएम माजी उपमहापौर युनूस ईसा यांच्यासह डॉ. खालीद परवेज, माजीद शेख यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या