
नवी दिल्ली : परस्पर संमतीने दोन समलैंगिकांनी ठेवलेले संबंध म्हणजे गुन्हा नसल्याचं काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाकडून जाहीर करण्यात आलं. कलम ३७७ विषयीचा हा निर्णय ऐतिहासिक ठरला असून त्याचं सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आलं. मानवी हक्कांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही आपली भूमिका एका वेगळ्या मार्गाने मांडली.
विविध विषयांवर आपल्या ठाम भूमिका मांडणाऱ्या गौतमने तृतीयपंथीयांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून डोक्यावर पदर घेऊन, कपाळावर टिकली लावून महिलांचा वेश धारण करत सर्वांनाच थक्क केलं. गौतम गंभीरने रक्षाबंधनाच्या दिवशी दोन तृतीयपंथीयांकडून राख्या बांधून घेत माणुसकीचं दर्शन घडवलं होतं. त्याने स्वत: ट्विटरवरून रक्षाबंधनाचे फोटो शेअर केले होते. स्त्री किंवी पुरुष असणे महत्त्वाचे नाही तर एक चांगला माणूस असणं जास्त गरजेचे आहे. अबीना अहर आणि सिमरन शेख या तृतीयपंथीयांनी आज माझ्या हातावर प्रेमाने राखी बांधली. मी त्यांना ते जसे आहेत तसे मान्य केले आहे. तुम्ही पण करणार ना?’ असे त्याने पोस्ट केले होते.