नगरमधील गॅस पाइपलाईन प्रकल्पाचा आज शुभारंभ

0

पंतप्रधान मोदी करणार दिल्लीतून प्रारंभ; रेल्वेमंत्री गोयल राहणार नगरला उपस्थित

अहमदनगर (प्रतिनिधी) – देशभरातील नागरिकांना पाईप जोडणीद्वारे घरगुती वापराचा गॅस वितरण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने आखली असून या अंतर्गत गुरुवारी (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील विज्ञानभवनातून नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यासह देशातील 63 क्षेत्रांतील सिटी गॅस प्रकल्प उभारणीचा प्रारंभ होणार आहे. व्हिडिओ स्ट्रिमिंगद्वारे एकाच वेळी देशभर हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती भारत गॅस रिसोर्सेस कंपनीच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

पंतप्रधान मोदी यांच्या सोबत विज्ञान तंत्रज्ञान व पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन व पेट्रोलियम धमेंद्र प्रधान उपस्थित राहणार आहेत. नगरमध्ये दुपारी 3 वाजता नगर-मनमाड रस्त्यावरील सिध्दी लॉन येथे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. नगरमधील या कार्यक्रमास रेल्वेमंत्री पीयूष गोयल, खा. दिलीप गांधी, आ. संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नगर आणि औरंगाबाद जिल्हा विभागातील सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन नेटवर्कसाठी भारत गॅस रिसोर्सेस कंपनीला प्राधिकृत करण्यात आले आहे. या दोन जिल्ह्यांत 106 सीएनजी स्टेशन प्रस्तावित आहेत. पाईप नैसर्गिक वायूचा लाभ सुमारे सात लाख आठ हजार 100 कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन नेटवर्क हे घरगुती व औद्योगिक तसेच व्यावसायिक गॅस पुरविण्यासाठी आणि विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्ये सीएनजी गॅस पुरविण्यासाठी आवश्यक पाईपलाईनचे परस्पर जोडलेले नेटवर्क आहे. 26 राज्ये आणि 178 विभागांतील 290 जिल्ह्यांत नैसर्गिक वायू उपलब्ध होणार असून या ठिकाणी 46 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या आणि 35 टक्के भौगोलिक क्षेत्राचा यात समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

*