गॅस स्फोटाने तिबेटीयन मार्केट गाळ्यांमधील लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान

0

नाशिक | दि. ७ प्रतिनिधी- जुन्या आयुक्तालयाजवळील तिबेटीयन मार्केट येथे एका गाळ्यात हॉटेलमधील सिलिंडरच्या नळीला गळती लागून गाळ्यात गॅस साठून झालेल्या स्फोटाने येथील परिसर हादरला. या स्फोटाच्या आवाजाने येथील आजूबाजूच्या १० गाळ्यांची पडझड झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गाळा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांगदवे पालवे (रा. शिवाजीरोड) असे या गाळे मालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिबेटीयन मार्केटमध्ये पश्‍चिमेकडून तिसर्‍या लाईनला पालवे यांचे सलग तीन गाळे आहेत. पालवे यांचे हॉटेल लकी चाईनीज हे आहे. या गाळ्यांमध्ये चाईनजचे पदार्थ शिजवले जात होते. तर कडेच्या एका गाळ्यामध्ये कामगारांना झोपण्याची व्यवस्था होती. या गाळ्यामध्ये पालवे यांनी गॅसची मोठी शेगडी जोडलेली होती. तर या ठिकाणी ६ सिलिंडर ठेवण्यात आले होते.

शेगडीला जोडण्यात आलेल्या सिलिंडरचा रेग्युलेटर सुरू होता. तर त्याची शेगडीला जोडली जाणारी नळीला गळती लागल्याने रात्रभर गॅस बाहेर पडत राहिला. यामुळे गाळ्यात गॅस साठून राहिला होता. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास याच गाळ्यात सुरू असलेल्या फ्रिजचा स्विच पडल्याने स्पार्क होऊन गाळ्यातील गॅसचा मोठा स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की, शेजारील दोन गाळ्यांचे शटर ऊडून समोरील गाळ्यांचे शटर तसेच दहा गाळ्यांचे वरील छते कोसळली. तसेच भिंतींचीही पडझड झाली.

रस्त्याच्या बाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या. छत अंगावर कोसळल्याने कामगार धडपडून उठून बाहेर पळाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. यामध्ये नितेश बेलापूरकर, दत्तू चौधरी यासह इतर तिघांच्या दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती कळताच पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, विजयकुमार मगर, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, सरकारवाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हा स्फोट गॅसच्या गळतीनेच झाल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी जवळील गाळे बंद ठेवण्यास सांगितले होते. यावेळी काही गुंडांनी आमचे व्यवसाय बंद तर तुमचे बंद करा, अशा धमक्या देत या व्यावसायिकांची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

 

आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
नाशिक महापालिकेच्या मालकीच्या व्यावसायिक गाळ्याचे सर्वेक्षण तात्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दोन वर्षांपूर्वी केले होते. यात अनेक गाळ्यात पोटभाडेकरु ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. तसेच अनेक गाळेधारकांचे करार देखील संपले होते. त्याचबरोबर काही ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय व ज्वलनशील पदार्थ ठेवले जात असल्याच्या तक्रारी होत्या. आज स्फोटाची घटना घडली, येथील एका गाळ्यात अंमली पदार्थाचा मोठा साठा सापडला होता. या पार्श्‍वभूमीवर आता महापालिका आयुक्त महापालिका मालकीच्या गाळ्यासंदर्भात काय भूमिका घेणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

स्फोट गॅसचाच
तिबेटीयन मार्केट येथे झालेला स्फोट व त्याची तीव्रता पाहता प्रथम दर्शनी आम्हाला वेगळा प्रकार वाटला. यासाठी आम्ही बॉम्बशोधक पथक, डॉग स्कॉड, फॉरेन्सिक लॅब यांच्या पथकांकडून तपासणी केली. तर पूर्ण समाधानासाठी पुणे येथील गॅस स्फोट तज्ञ पथकाकडूनही आपण तपासणी करून घेतली. या सर्वांचा निष्कर्षानुसार नळीमधून लीक झालेला गॅस हा बंद गाळ्यात मोठ्या प्रमाणात साठला होता. याचा दबाव आतमध्ये निर्माण झाला होता. लाईटचा छोटाशा स्पार्कने दाब वाढलेल्या या गॅसचा स्फोट झाला. – डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त

एनडीआरएफ पथकाकडूनही तपासणी
आयुक्तांच्या आदेशानुसार काही वेळातच या ठिकाणी बॉम्बशोधक व नाशक पथक, डॉगस्कॉड, दहशतवादी विरोधी पथक, फॉरेन्सिक लॅबचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी स्फोटाच्या ठिकाणाची व इतर परिसराची बारकाईने पाहणी केली. परंतु गॅस वगळता स्फोटामागील इतर कारण पुढे येऊ शकले नाही. तरीही पूर्ण शंका निरासनासाठी पुणे येथील नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) या विशेष स्फोटक अभ्यासक पथकाकडून रात्री घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. रात्री पाऊस तसेच घटनास्थळी अंधाराची अडचण निर्माण झाल्याने हे पथक सकाळी पुन्हा तपासणी करून काही साहित्य तपासणीसाठी ताब्यात घेणार असल्याचेे सूत्रांनी सांगितले.

‘त्या’ नुकसानीची भरपाई घेणार : आयुक्त
महापालिकेच्या तिबेटीयन मार्केटमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणानंतर संबंधीत गाळेधारकांस महापालिकेकडून येत्या सोमवारी नुकसान भरपाई करुन देण्यासंदर्भात नोटीस बजावली जाणार आहे. तसेच महापालिका अग्निशमन विभागाकडून देखील संबंधीत गाळेधारकांस नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली.

LEAVE A REPLY

*