गॅसचा काळाबाजार करणार्‍या एजन्सीवर कारवाई करा

0

पुरवठा अधिकारी निवेदन स्वीकारत नसल्याचा मानवाधिकार मिशनचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील गॅस एजन्सींमध्ये गॅस सिलेंडर धारकांना गॅस न देता बेकायदेशीरपणे अधिक दराने त्याचा काळाबाजार चालू असून, संबंधित गॅस एजन्सींवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय मानवधिकार मिशनच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन पुरवठा अधिकारी स्वीकारत नसल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी दिली.
गॅस एजन्सींमध्ये तीन हजार पर्यंत गॅसधारक असून, त्यांना दररोज 300 टाक्यांची गरज असते. परंतू 300 पैकी 150 गॅस टाक्यांचीच विक्री होत असून, उर्वरीत निम्म्या गॅस टाक्यांचा काळाबाजार चालू असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे.
याबाबत 73 गॅस धारकांनी लेखी तक्रार संघटनेकडे केली असून, वारंवार गॅससाठी हेलपाटे एजन्सीमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. दोन महिन्यांपासून गॅस उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
संघटनेने पुरवठा विभागाकडे माहिती अधिकारात संबंधित गॅस एजन्सीला दोन महिन्यांत विक्रीसाठी किती गॅस टाक्यांचा पुरवठा झाल्याची माहिती मागितली होती.
परंतु सदर माहिती देण्यास पुरवठा विभागाच्या वतीने असमर्थता दर्शवून नाशिक येथून माहिती घेण्याचा सल्ला दिला. गॅस धारकांना सुरळीत गॅस पुरवठा होऊन, गॅस टाक्यांचा काळाबाजर थांबविण्यासाठी गॅस एजन्सीवर कारवाई करावी.
तसेच एजन्सीला होणारा गॅस टाक्यांचा पुरवठा व ग्राहकांना मिळणार्‍या टाक्यांची माहिती मिळण्याची मागणी आखिल भारतीय मानवधिकार मिशनच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*