Type to search

क्रीडा ब्लॉग

Blog: मैदानावरील ‘हिमा’लय

Share

प्रिय हिमा, नमस्कार.

खुप दिवसापासून तुला पत्र लिहुन माझ्या मनातील भावना व्यक्त करायचं मनात होतं. आपल्या मनातील विचार, भावना व्यक्त करण्याचे पत्राइतके प्रभावी माध्यम नाही हे आजही फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यात वावरत असलो तरी ठामपणे सांगु शकतो.. असो.

हिमा, यशाचा क्रम टिकवून ठेवत तू 15 दिवसात चौथे सुवर्ण पदक जिंकलंस. टाबोर अ‍ॅथलेटिक्स टूर्नामेंटमध्ये केवळ 3.25 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत सुवर्णपदक तू आपल्या नावावर केलेस. याआधी तू 2 जुलै, 6 जुलै आणि 14 जुलै रोजीही तीन सुवर्णपदक जिंकले होते. तुझा हा सुवर्णचौकार खूपच भावला आणि अभिमान दाटून आला. सलग पंधरा दिवसात तू आपल्या देशाला चार सुवर्ण मिळवून दिलेस. आपल्या बक्षीसाच्या रकमेतली अर्धी रक्कम आसाममधील पुरग्रस्तांसाठी देऊन दिलदारपणा दाखविलास.. कुठुन आणलास गं इतका मनाचा मोठेपणा ?

तुझ्या या दैदिप्यमान सुवर्ण चौकाराच्या कामगिरीला आणि दातृत्त्वाला माझा सलाम हिमा! मला आठवतंय गतवर्षी क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा भारत इंग्लंडला त्याच्याच मायभूमीत करारी मात देत होता. तेव्हा ट्विटरवर पहिला ट्रेंड, ना 6 विकेट घेणार्‍या कुलदीप यादवचा होता, ना शतक ठोकणार्‍या रोहित शर्माचा होता. तेव्हा ट्रेंड होता काही मिनीटापूर्वी फिनलँडच्या टेम्पेयरमध्ये रचलेल्या हिमा फक्त आणि फक्त तुझ्या ऐतिहासिक सुवर्णांकीत कामगिरीचा. गतवर्षी 2018 मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत हिमा तू वयाच्या 18 व्या वर्षीच इतिहास घडवताना 400 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतंस. 51.46 सेकंदाची वेळ नोंदवताना तू अनेक विक्रम आपल्या नावावर केलेले आणि कोणत्याही धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली होतीस..आजही त्या गोष्टीचा अभिमान वाटतो.

दुसर्‍या क्रमांकावर आलेली रोमानिया ची आंड्रेया मिकोलोसने नोंदवलेली वेळ 52.07 सेकंदाची होती तर ही स्पर्धा जिंकण्याची दावेदार असलेली अमेरिकेची टायलर मेंसन 52.28 सेकंदाची वेळ नोंदवत तिसर्‍या क्रमांकावर फेकली गेली. हिमा तुझ्यात आणि दुसर्‍या क्रमांकावर आलेल्या धावपटू मधील वेळेच अंतर 0.61 सेकंदाने जास्ती होतं. भारताच्या पी.टी.उषा ला 1 शतांश सेकंदाने एका जागतिक स्पर्धेत पदक हुकल असताना 0.61 सेकंद वेळेचा हा फरक हिमा तुझ्या धावण्यातील कौशल्य अधिक अधोरेखित करत आहे. पदक स्वीकारुन झाल्यावर भारताचे राष्ट्रगीत चालू झाल्यावर हिमा तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहताना अनेक लोकांनी बघितलं असेल. राष्ट्रप्रेमाची आणि देशाच्या अभिमानाची झलक त्या अश्रूतून दिसत असली तरी त्यामागे 18 वर्षाचा प्रवास आहे.

एकतर हिमा दास नावाची तू कोणी भारतीय धावपटू अश्या एखाद्या जागतिक स्पर्धेत भाग घेते आहे हे आसामीच काय तर भारतीयांच्या ध्यानीमनीही नव्हतं. कोणाच्या खिजगणतीत नसलेली तू अचानक सर्व भारतीयांच्या चर्चेचा चेहरा बनलीस. आसाममधल्या ढिंग ह्या छोट्याश्या गावातून येऊन देशाच प्रतिनिधित्व एका जागतिक स्पर्धेत करणार्‍या हिमा तुझ्याबद्दल आम्ही खेळात देशाचा सो कॉल्ड अभिमान शोधणारे सामान्य भारतीय अनभिज्ञ असतो ही ह्या देशाची शोकांतिका आहे. हिमा, तू कौशल्याने देशाचं नाव एथेल्याटीक्स मध्ये उंचीवर नेल्यावर ह्याच खेळाशी संलग्न संस्था तुला इंग्रजी बोलता येत नाही ह्यावर ट्वीट करते. बरं ते ट्वीट लिहिताना स्वतःच त्यातही स्पेलिंग मिस्टेक करते. नंतर माफी मागून सारवासारव करते. ह्यापेक्षा एका खेळाडू म्हणून तुझं ह्युमीलीयेशन असू शकत नाही…लाज वाटते हिमा आमच्यातल्या नतदृष्टांची.

हिमा, अगं तुझा प्रवास इतका खडतर आहे की त्या दिवशी सुवर्णपदक घेताना तो 18 वर्षाचा काळ त्या 2 मिनिटात तुला पूर्ण आठवला असेल याची कल्पना मला आहेच महाभारतातील अर्जुनाला गुरु द्रोणाचार्य यांनी विचारलं होतं, अर्जुना, तु त्या झाडाच्या दिशेने आता बाण सोडत आहेस पण तुला समोर काय दिसतंय ते सांग? तेव्हा अर्जुन म्हणाला होता, गुरुवर्य, मला झाडाच्या फांदीवर बसलेल्या त्या पक्ष्याचा फक्त डोळा दिसतोय बस्स अर्जुनाचं उदाहरण द्यायचं कारण फक्त एव्हड्याचसाठी हिमा, तू पोरगीच बिनधास्त आहे. वार्‍यासारखी पळते, वार्‍यासारखीच वागते. तुला भीती नावाची गोष्टच माहीत नाही. तुला ना हिमा, त्या अर्जुनासारखी एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे फिनिशिंग लाईन. रेस कुठलीही असो, सगळ्यांच्या पुढं जायचं एव्हढच तुझ्या डोक्यात.. कोण देतं रे तुला ही प्रेरणा?..छानच की!! हिमा, तु 3 इडियट नावाचा अमीर खानचा चित्रपट पाहिला काय? नसेल पाहिला तरी त्या चित्रपटात एक डायलॉग आहे..तो सांगतो. बच्चा काबिल बनो, काबिल! कामयाबी तो साली झक मारके पीछे भागेगी Be Skilled and do whatever you want to do हिमा, तुझंही तसंच आहे ..तुझं वाक्य मला आठवतंय. तु सहजपणे म्हणायचीस, मेडलच्या मागे मी धावत नसते. मी टायमिंग च्या पाठी धावते.. टायमिंग जमलं तर मेडल माझ्या मागे धावतील….किती सुंदर, आणि आत्मविश्वासपूर्वक सकारात्मक विचार करतेस गं हिमा..

हिमा, तु सुपरस्टार म्हणून फिनलँडच्या टेम्परे येथील खेळपट्टी वर उदयाला आलीस आणि आपली जबरदस्त छाप सोडलीस आणि महत्त्वाचे म्हणजे तु उत्कृष्ट कामगिरी करून प्रेक्षकाची मन जिंकलीस आणि कृतीतून आदरच काय हृदय सुद्धा जिंकुन घेतलंस. सुवर्णपदक मिळाल्यानंतर राष्ट्रगीत वाजत असताना हिमा तु अश्रुंना वाट मोकळी करून दिली होतीस.. तुझ्या त्या आसवांमध्ये जबरदस्त ताकद दिसत होती.त्यात,तु घेतलेल्या मेहनतीला दिलेली दाद होती. तुझ्या प्रतिक्षेला फळ मिळाल्याचा आनंद होता.तुला मिळालेल्या विजयाचं ते प्रतिक होतं तसेच तुझ्या या आसवांतून तुझं देशप्रेम व आदर भरभरुन दिसत होतं.. गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलेलं तुझं स्वप्न पूर्ण झालं होतं. तुझ्या त्या अश्रुंनी देशही हेलावला होता. प्रतिकूल परिस्थितीत मेहनत करणार्‍या हजारो खेळाडूंनी हिमा तुझ्यात स्वत:ला पाहिलं होतं गं..हिमा तुझे ते अश्रू आम्हाला खूप काही सांगून गेले .एका सामान्य कुटुंबातून असामान्य प्रवास केल्यावर आपल्या कार्याची दखल म्हणून देशाचं राष्ट्रगान म्हटलं जाते हे कोणासाठी ही अभिमानाची गोष्ट आहेच.

पण त्या पलीकडे तुझी एकटीने, जिद्दीने केलेल्या प्रवासाची परिपूर्णता त्या अश्रूनमधून सगळ्यांच्या समोर आली हे नक्की. त्या अश्रूमध्ये तुझा प्रवास होता ज्यात धावण्याच्या सरावासाठी जागा उपलब्ध करण्यापासून ते लोकांकडून पैसे मागून भाड्याच एक घर उपलब्ध करून देण्यापर्यंत. म्हणून हिमा जेव्हा तु तुझ्या कोचशी फोनवर बोलली. तेव्हा तुझे शब्द होते what have I done? त्या अश्रूंची किंमत हिमा तुला तर नक्कीच कळली असेल पण माझ्या सारख्या किती भारतीयांना कळली हा मोठा प्रश्न आहे. ज्या देशासाठी आपण प्रतिनिधित्व करतो त्या भारत देशासाठी आपण काहीतरी करु शकलो ही कृतज्ञता होती ना त्यात. साधे पण परिणामकारक वर्तन फक्त एक संवेदनशील मनुष्यच करू शकतो. हाच बोध होता ना तो. एक खेळाडू म्हणून तू वेगळीच उंची गाठली आहे पण माणूस म्हणून तुझं वेगळेपण सार्‍या जगानं तेव्हा पाहिलं. कठोर परिश्रमाशिवाय यश मिळविताच येत नाही असा मंत्र देऊन आपल्या जीवनात क्रांती घडविणार्‍या हिमा दास तुझ्या जिद्दीला सलाम.

– ओमप्रकाश देंडगे
जनता विद्या मंदिर, कान्हूर पठार
9767788778

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!