Type to search

ब्लॉग सार्वमत

Blog: ‘कचरा’ कारण

Share

अहमदनगर शहराचा कचरा प्रश्‍न फार पूर्वीपासूनच आहे. बुरूडगाव कचरा डेपोवर जाणार्‍या गाड्या अडविणे, तेथे कचर्‍यावर प्रक्रिया न करताच कचरा डम्प करणे, मेलेले जनावरे आणून टाकणे असे प्रकार घडत होते. त्यामुळेच बुरूडगावकरांनी हा प्रश्‍न न्यायालायत नेला. राष्ट्रीय हरित लवादाची स्थापना झाल्यानंतर न्यायालयातील हे प्रकरण लवादाकडे वर्ग झाले. लवादाने जेंव्हा काठी उगारायला सुरूवात केली, त्यावेळी महापालिका जागी झाली. त्यातूनच सावेडी परिसरात कचरा डेपो करण्याचा निर्णय झाला.

सावेडीला कचरा डेपोसाठी जागा निश्‍चित झाली, तेथे कचरा आणण्यात येणार, हे देखील सर्वांनाच ज्ञात होते. अनेकांनी तर उपनगरातील कचरा सावेडीला आणि मध्यशहरातील कचरा बुरूडगावला, असा पर्यायही सुचविला होता. सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होऊन निर्णय झाला. त्यावेळी सत्तेवर कोण होते, यापेक्षा सभागृहात निर्णय घेताना सर्वच पक्षाचे होते, हे विसरून चालणार नाही. त्यावेळी गप्प बसणारे आता सावेडीला कचरा डेपो नको, म्हणून गळा काढत आहेत. मुळात दररोज सुमारे सव्वाशे टन कचरा निर्माण होणार्‍या शहरात त्याची विल्हेवाट कशी लावायची, त्यामुळे होणारी सामुहिक रोगराई कशी वाचवायची, याचा विचार करण्याऐवजी कचरा डेपो करण्याचे पाप कुणाचे, यावर आता राजकारणी चर्चा करत बसले आहेत. केवळ मतांच्या राजकारणासाठी हे चालू आहे.

सावेडीसारख्या वेगाने विकसित होणार्‍या उपनगरात कचरा डेपो आणायचा का, याचा विचार सुरूवातीलाच होणे आवश्यक होते. मात्र कचरा डेपोसाठी जागा कोणीच द्यायला तयार नसल्याने आणि ती सावेडीत उपलब्ध झाल्याने दुसरा कोणताही पर्याय महापालिकेसमोर नव्हता. एवढेच नव्हे, तरी सावेडी कचरा डेपोची जागा तातडीने ताब्यात घ्यावी, अशी मागणी करतानाच ती ताब्यात घेण्यास प्रशासन का विलंब लावत आहे, असा जोरकस प्रश्‍नही त्यावेळी विचारला जात होता. त्यामुळे कचरा डेपो कोणी आणला, आता कोणामुळे तो जाणार वगैरे प्रश्‍न निव्वळ कुचकामी आहेत.

सावेडी कचरा डेपोला आग लागली की कोणी लावली, याचा शोध घेण्याची गरज आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीने मध्यंतरी महापालिकेवर मोर्चा काढून सावेडी कचरा डेपो हलवा, अशी मागणी केली. राष्ट्रवीदीने मोर्चा काढल्यामुळे आपण मागे पडायला नको, म्हणून शिवसेनेने त्याचवेळी पत्रकार परिषद घेऊन सावेडीत कचरा डेपो आणण्याचे पाप राष्ट्रवादीचेच असल्याचे सांगून हात वर केले. मतांसाठी चाललेल्या या ‘कचरा’कारणात शहराचे दोन प्रमुख नेते होते. त्यात एकाने पंचवीस वर्षे शहरात सत्ता राबविली, तर दुसरे गेल्या साडेचार वर्षांपासून उपभोगत आहेत. लोकप्रतिनिधींनी कचरा सारख्या गंभीर विषयावर तरी संयम पाळणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादीच्या मोर्चामुळे महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी कचरा डेपो महिनाभरात हलविण्याचा प्रयत्न करू, असे लेखी दिले. यामुळे आता कचरा डेपो हलविला जाईल, या भ्रमात कचरा डेपोचा दैनंदीन त्रास सहन करणार्‍यांना वाटत असेल, तरी त्यांची निव्वळ फसवणूक आहे. उलट मोर्चामुळे हा त्रास आणखी वाढणार आहे.

याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेला कोट्यवधींचा निधी दिला आहे. या निधीतून बुरूडगाव कचरा डेपोमध्ये मृत जनावरे जाळण्यापासून, तेथे जमा होणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार होते (किंवा आहे). मात्र कचरा डेपो शहरात नकोच, तो महापालिकेबाहेर दहा किलोमिटर दूरवर न्याय, अशी मागणी करत बुरूडगाव येथील कचरा डेपो विकसित करण्यासही आ. संग्राम जगताप यांनी मोर्चावेळी विरोध दर्शविला. बुरूडगाव येथील कचरा डेपो नियमित सुरू झाल्यानंतर सावेडीतील ताण कमी होणार आहे. दोन्हीकडे प्रक्रिया प्रकल्प सुरू झाल्यानंतर दररोज कचरा शिल्लक राहण्याचे प्रमाण अगदी नगण्य किंवा नसेलही.

मात्र बुरूडगावला कचरा डेपो नको, म्हणून पुन्हा मतांचे राजकारण जपण्याच्या भूमिकेमुळे सावेडीतील हे मरण आणखी वाढण्याची शक्यता आहे. आपल्या गावचा कचरा आपणच नको म्हणत असू, तर बाहेरचे तो कसा स्वीकारतील, असा साधा विचार प्रत्येकाने करायला हवा. त्यामुळे शहराबाहेर कचरा डेपो होणे, त्यासाठी जागा मिळणे दुरापास्त आहे. कचर्‍यावर राजकारण न करता सर्व पक्षीयांनी शहराचा आरोग्याचा प्रश्‍न म्हणून याकडे पाहून वेळीच मार्ग काढण्याची गरज आहे. तसे झाले तरच सावेडीकरांचा त्रास काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. अन्यथा कचरा येत राहणार, दुर्गंधी सुटत राहणार, तेथे आग लागत राहणार आणि राजकारणी मतांसाठी मोर्चे काढतच राहणार.

– सुहास देशपांडे
  9850784184

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!