लोणी मावळा सामूहिक अत्याचार व खून प्रकरणी तीनही आरोपी दोषी; आज शिक्षा सुनावणार

0
दत्ता शिंदे
संतोष लोणकर
मंगेश लोणकर
अहमदनगर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथे एका शालेय मुलीवर सामूहिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला चालला. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सक्षम परिस्थितिजन्य पुरावे व सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने या प्रकरणातील तिघाही आरोपींना दोषी धरले आहे. आज मंगळवार दि. 7 रोजी या तीनही आरोपींना न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. संतोष विष्णू लोणकर, मंगेश दत्ता लोणकर व दत्ता शंकर शिंदे (तिघे रा. लोणी मावळा, ता. पारनेर) अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणातील संबंधित मुलगी लोणी मावळा या गावात राहत होती. नववी पास झाल्यामुळे शिक्षणासाठी ती अळकुटी येथील एका विद्यालयात जात होती. परीक्षा सुरू असल्यामुळे शाळेच्या वेळापत्रकात बदल झाला होता. घर रानात असल्यामुळे घरी जाण्यास मोठी पायपीट करावी लागत होती. 22 ऑगस्ट 2014 रोजी ही मुलगी लोणी मावळा येथील तिच्या घराकडे चारी रस्त्याने जात होती.
त्यावेळी संतोष लोणकर याने तिला अडविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या भीतिपोटी त्या मुलीने घर जवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला गाठण्यासाठी लोणकर याने मंगेश व दत्तात्रय यांची मदत घेतली. घराकडे जाणार्‍या सामसूम रस्त्यावर आरोपींनी तिच्यावर हल्ला केला. तिला मारहाण करीत तोंड दाबून चारीच्या आडोशाला नेले. निर्जन स्थळाचा फायदा घेत तिघांनी त्या मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला. तिने तिघांना विरोध केला असता त्यांनी तिला पाण्याच्या दलदलीत पाडून तिच्या तोंडात चिखल कोबला.
तरी देखील जिवाच्या आकांताने तिने तिघांच्या शरिरावर नखाने ओरखडले. तिघांपासून सुटका करण्यासाठी तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी तोंड दाबून घशात चिखल कोबला. तरी देखील पीडित मुलीने तिघांशी झुंज सुरूच ठेवली. मात्र त्यांच्या राक्षसी कृत्यापुढे ती हतबल झाली. तिघांनी अत्याचार केल्यानंतर, घडलेली घटना कोणाला समजू नये यासाठी तिच्या डोक्यात स्क्रू ड्रायव्हरने वार केले.
अखेरचा श्वास घेईपर्यंत आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलगी जिवंत राहु नये यासाठी आरोपींनी तिच्या डोक्यात दगड घातला व तिघे घटनास्थळाहून पसार झाले. यवेळी तिच्या पाठीवरील दप्तर चारीच्या चिखलात अस्ताव्यस्त पडले होते.
दरम्यान, रात्र झाली तरी मुलगी घरी का येईना. म्हणून आईवडिलांचा जीव टांगतीला लागला होता. पालक, नातेवाईक यांनी बॅटर्‍या घेऊन लोणी मावळाचा शिवार पायाखाली घातला. रात्री उशिरा चारीच्या कडेला अस्तव्यस्त पडलेले दप्तर एका व्यक्तीच्या नजरेस पडले. त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती पसरल्याने पारनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली. हा प्रकार कोणी केला, कसा केला याबाबत कोणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
त्याच रात्री हा प्रकार तत्कालीन पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अप्पर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलीस उपअधीक्षक यादवराव पाटील व पारनेर पोलीस निरीक्षक जांभळे यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या दिवशी मोठा पोलीस फौजफाटा तपासासाठी लावण्यात आला होता. दिवस उजाडेपर्यंत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही.
जनतेचा आक्रोश वाढत चालला होता. यावेळी पीडित मुलीच्या एका मैत्रिणीने लोणकर हा त्रास देत होता अशी माहिती दिली होती. त्याचा आधार घेत पोलिसांनी त्याच्या दिनक्रमावर कटाक्ष ठेवला. दरम्यान त्याने ही घटना केल्याची कबुली एका व्यक्तीजवळ दिली होती. त्यामुळे पोलीस प्रशासन तणावात असताना पाटील व जांभळे यांच्या पथकाने 23 ऑगस्ट 2014 रोजी पहिला आरोपी संतोष लोणकर यास बेड्या ठोकल्या. त्याची चौकशी केली असता त्याने प्रथमत: गुन्ह्याची कबुली दिली नाही.
मात्र सबळ पुराव्याचा संदर्भ देताच त्याने घटनाक्रम कथन केला. पहिल्याच दिवशी त्याच्याकडून कपडे, स्क्रू ड्रायव्हर यासह महत्त्वाच्या वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या. त्यानंतर आरोपी मंगेश व दत्ता यांना 26 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यांनी देखील पोलिसांना घटनाक्रमाचा उलगडा करुन दाखविला. या तिघांकडून सबळ पुरावे जमा करण्यात आले. साक्षीदार, पंच, वैद्यकीय अहवाल, अधिकार्‍यांचे जबाब असे सक्षम दोषारोपपत्र 18 नोव्हेंबर 2017 रोजी पोलीस निरीक्षक जांभळे यांनी न्यायालयात सादर केले होते.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली होती. शासनाने ती मान्य करून निकम यांच्याकडे खटल्याची धुरा दिली होती. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत निकम यांनी या खटल्यात अविरत परिश्रम घेतले होते. सरकार पक्षातर्फे परिस्थितिजन्य 24 पुरावे, 32 साक्षीदारांना तपासण्यात आले होते.
सरकार पक्षाचा प्रबळ युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तिघांना दोषी धरले आहे. त्यांना आज मंगळवार दि. 7 रोेजी दुपारी शिक्षा ठोठावली जाणणार आहे. ही शिक्षा काय असेल हे न्यायालयाच्या गुलदस्त्यात आहे. मात्र तिघांना कठोर शिक्षा होईल असे मत विधिज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळे आज या घटनेचा निकाल काय लागतो आहे, याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.
या वस्तू हस्तगत केल्या – 
घटना घडल्यानंतर पोलिसांनी पहिल्या दिवशी पीडित मुलीचे दप्तर, तिच्या तोंडात कोंबलेला चिखल, तिच्या अंगावरील कपडे, दुसर्‍या दिवशी आरोपी लोणकरचे कपडे, स्क्रू ड्रायव्हर, गुन्ह्याच्या वेळी वापरलेले वाहन, आरोपीच्या पायाचा चिखल, पीडित मुलीच्या डोक्यात टाकलेला दगड या वस्तू हस्तगत केल्या होत्या. हे पुरावे महत्त्वाचे ठरले आहेत.
या पुराव्यांमुळे फास मजबूत झाला – 
घटना घडल्यानंतर दुसर्‍या दिवशी पीडित मुलीच्या मैत्रिणीने लोणकर हा त्रास देत होता. तो नेहमी त्रास देतो असे ती सांगत होती. त्यानुसार त्यास अटक करण्यात आली. तसेच गनी पठाण यांच्याकडे आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली होती. आरोपीच्या अंगावरील चिखल व पीडित मुलीच्या घशातील चिखल एकच होता. तसेच पीडित मुलीने विरोध करताना आरोपींच्या अंगावर ओरखडे काढले होते. स्क्रू ड्रायव्हर विकत घेतलेल्या संबंधित दुकानदाराने तो ओखळला होता. अशा भक्कम परिस्थितिजन्य पुराव्यांमुळे शिक्षेचा फास मजबूत झाला आहे.
मनुष्य खोटे बोलेल, परिस्थिती नाही – 
या घटनेत सर्व परिस्थितिजन्य पुरावे होते. घटना बघणारा प्रत्यक्ष साक्षीदार कोणी नव्हता. त्यामुळे प्रत्येक घटना, साक्ष, पुरावे कोर्टापुढे सिद्ध करावे लागले. मनुष्य खोटे बोलू शकतो. मात्र परिस्थिती खोटे बोलू शकत नाही. हे या खटल्याने सिद्ध झाले आहे. त्यामुळे न्यायालय योग्य ती शिक्षा सुनावेल, असा विश्वास आहे.
– अ‍ॅड. उज्ज्वल निकम (विशेष सरकारी वकील)

LEAVE A REPLY

*