गंगापूररोड : प्लास्टिक मासा देतोय दुष्परिणामांचा संदेश

गंगापूररोड : प्लास्टिक मासा देतोय दुष्परिणामांचा संदेश

नाशिक । अतिरिक्त प्लास्टिक वापराचा मानवाप्रमाणेच अन्य वन्यजीवांसह समुद्रातील प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत होत आहे. भविष्यातही प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते आहे. भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन प्लास्टिकच्या वाढत्या प्रदुषणाविरोधात मानव उत्थान मंचतर्फे अनोख्या प्रकारे जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गंगापूररोडवरील व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मासा साकारण्यात आला असून त्याद्वारे प्लास्टिक वापर टाळण्याचा संदेश दिला जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मानव उत्थान मंचचे स्वयंसेवक मासा साकारण्यासाठी परिश्रम घेत आहे. या स्वयंसेवकांनी अथक प्रयत्नातून 55 फूट बाय 25 फूट आकाराचा मासा साकारण्यात आला आहे. तर या मास्याभोवती असलेल्या प्लास्टिकच्या घटकांमुळे त्याच्या जीवनावर होणारा परिणाम विशद करतांना, प्लास्टिकमुळे होणार्‍या नुकसानापासून बचाव करण्याचा संदेश यानिमित्त देण्यात येत आहे.

सोमवारपासून (दि.9) प्रदर्शन नाशिककरांसाठी खुले करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.10) दिवसभर प्रदर्शन सर्वांना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाच्या ठिकाणी प्लास्टिक वापराचे नुकसान विविध माहितीपत्रांतून दाखविण्यात आले आहेत. दुसर्‍या टप्प्यात रामकुंड परिसरात प्लास्टिक वापराविरोधात जनजागृती करण्यासाठी बुधवारपासून (दि.11) ते रविवार (दि.15) पर्यंत प्रदर्शन भरविले जाईल; तर तिसर्‍या टप्प्यात दर आठवड्याला शाळांमध्ये जाऊन प्रदर्शन भरविणार असल्याचे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मानव उत्थान मंचचे जगबिरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक यश भामरे, रोशन केदार, जाकीया शेख, आकाश पटेल, अर्जुन धामे, पंकज जोशी, सृष्टीसिंग, पराग चौधरी, विशाखा भाबड, विकास ठाकरे आदींनी प्रदर्शन उभारणीसाठी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com