गंगापूर धरणसाठा @ 80 %

0
नाशिक ।  गेल्या पाच-सहा दिवसांंपासून जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील त्र्यंबक व नाशिक तालुक्यातील आणि विशेषत: गंगापूर समूह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करुन तो 2962 आणण्यात आला आहे.

त्यामुळे पुराची पातळी काहीसी कमी झाली असली तरी गंगापूर धरणातील साठा 80 टक्क्यांच्यावर झाला आहे. परिणामी नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या दोन आठवड्यांपासून जोरदार पाऊस सुरू आहेे. या संततधार पावसामुळे गोदावरीला येऊन मिळणार्‍या लहान-मोठ्या नद्या नाल्याच्या पाण्यामुळे आणि गंगापूर धरणातील वाढता साठा लक्षात घेता विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीला पूर सुरू आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून गोदावरीला कमी अधिक प्रमाणात पुराचे स्वरुप कायम आहे. यामुळे गोदाकाठावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वित्त व जीवितहानी होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने गोदावरीला सोडण्यात येणारा विसर्ग लक्षात घेत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहे.

त्यामुळे महापालिका आपत्ती व्यवस्थापनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहे.

गेल्या दहा-बारा दिवसांपासून गंगापूर समूह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरणातील साठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. धरणातील साठा 74 टक्क्यांंपर्यत गेल्यापासून जलसंपदा विभागाने धरणातून विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे गोदावरीला पूर सुरु झाला आहे.

यातच चार-पाच दिवसांपुर्वी आळंदी धरण 100 टक्के भरल्यानंतर त्या धरणातील विसर्ग गोंदावरीत येऊन मिसळत असल्याने नदीच्या पुराची पातळी वाढत आहे. या एकूणच पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी गंगापूर धरणातून दुपारी 3 वाजता 3997 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता.

तो रात्री 8 वाजता 5109 क्युसेक करण्यात आल्याने पुराची पातळी आणखी वाढली गेली होती. त्यानतंर दुसर्‍या दिवशी (दि.29) गंगापूर धरणातील विसर्ग 5109 क्युसेक इतका सुरूच ठेवण्यात आला होता. त्यानंतर मात्र शनिवारी (दि.29) रात्री धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर जलसंपदा विभागाने धरणातील विसर्ग 2962 क्युसेक इतका केल्याने आता पुराची पातळी काहीअंशी कमी झाली आहे.

तरीही गंगापूर धरणातील साठा 80.71 टक्के इतका झाला आहे. पावसाची स्थिती लक्षात घेऊन आता धरणातील विसर्ग कमी केला जात आहे. गंगापूर समूह धरणातील जलसाठा लक्षात घेता नाशिककरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून पुढच्या वर्षासाठी शेतीला दिल्या जाणार्‍या पाण्यासाठीची शेतकर्‍यांची चिंता मिटली आहे.

LEAVE A REPLY

*