Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

विसर्ग न करताच रात्रीतून गंगापूरचे ५ टक्के पाणी गायब होते तेव्हा…

Share

नाशिक । दि. 4 प्रतिनिधी

थेंबभर पाण्याचा विसर्ग केलेला नाही, हजारो टँकर भरून किंवा मोठ्या पाईपलाईनमधून पाणीही उपसलेले नाही.. तरीही एका रात्रीतून गंगापूर धरणातील ५ टक्के म्हणजेच 228 द.ल.घ.फू. गायब झाल्याने निवासी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले.

काल संध्याकाळी गंगापूर धरणाचा पाणीसाठा १०१ टक्के असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यात आज सकाळी तो पुन्हा ९६ टक्क्यांवर आला. त्यामुळे अचानक हा इतका पाणीसाठा कसा घटला? या प्रश्नाने जिल्हा प्रशासनाची धावपळ झाली.

आज सकाळपासून या पाच टक्के पाण्याचे काय झाले? याच चिंतेत अधिकारी होते. आतापर्यंत धरणातील पाणीसाठ्याचा अनेकदा हिशेब केला. इतकेच नव्हे, तर पाण्याची पातळीही मोजून पाहिली. या महिन्यातील पडलेला पाऊस आणि धरणातील पाणीसाठ्याची पातळी अशी सर्व माहिती घेऊन झाली.‍

पण छे ! इतके पाणी कुठे गेले त्याचा कुणालाच पत्ता लागेना. अखेर दररोज हा अहवाल तयार करणाऱ्या लिपिकाने या बाबतीत प्रकाश पाडला आणि सारेच रहस्य क्षणात उलगडले.

लिपिक महोद्यांनी सांगितलेली माहिती अशी – झाले असे होते की धरणाच्या पाणीसाठ्याचा अहवाल तयार करणाऱ्या या लिपिक महोद्यांची तब्येत काल बिघडली होती. त्याच अवस्थेत त्यांनी आकडेमोड केली आणि ९६ टक्क्यांवर असलेला पाणीसाठा  ५ टक्क्यांनी वाढवून १०१ टक्के असा लिहिला.

सकाळी पुन्हा हा पाणीसाठा मोजला तेव्हा तो प्रत्यक्ष ९६ टक्क्यांवर असल्याचे लक्षात आले आणि खळबळ उडाली. मात्र खरे कारण समजले तेव्हा हसून हसून सर्वांची मुरकुंडी वळाली.

एकीकडे  हे सर्व आकडेमोडीचे नाट्य होत असतानाच धरण १०१ टक्के भरल्याने आता पाणी सोडतील आणि नदीला पूर येणार अशी भीती गोदाकाठच्या रहिवाशांना वाटली. अगदी नदीकाठी घरे असणाऱ्यांची तर रात्री झोपच उडाली.

2006 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धरण पूर्णपणे भरले त्यावेळी वेळीच खबरदारी न घेतली गेल्याने धरणाचे सर्व दरवाजे एकाचवेळी उघडण्यात आल्याने नाशिकमध्ये महापूर आला. तसेच आता होते की काय असा या नदीकाठच्या रहिवाशांचा समज झाला.

पण आज खरे सत्य उलगडले आणि ही वरूण राजाची कृपा नसून लिपिक महोदयांची असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!