Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

गंगागिरी महाराज संस्थानची बदनामी करणार्‍या तोतया पत्रकारास अटक

Share

दोन कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न; तीन दिवस पोलीस कोठडी

कोपरगाव (प्रतिनिधी) – श्रीरामपूर तालुक्यातील सराला बेट येथील गंगागिरी महाराज देवस्थानची बदनामी करण्याची भीती दाखवून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या यू ट्यूबच्या तोतया पत्रकारास पोलिसांनी अटक केली आहे. त्यास पोलिसांनी काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील आणि वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील सराला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांच्याकडून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोनालिसा सोसायटी, डोंबिवली एमआयडीसी कल्याण येथील विनायक कांगणेला म्हसरूळ पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.

याप्रकरणी वैजापूर तालुक्यातील बाबासाहेब थेटे (रा. सायखेड गंगा ता. वैजापूर, जिल्हा औरंगाबाद) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी येवला तालुक्यातील तळवाडे येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 200 ते 250 वर्षांची परंपरा असलेल्या या सप्ताहात लाखो भाविक येतात. या कार्यक्रमाला संशयित आरोपी तिथे आला होता. त्याचे यू टयूबचे आधार नावाचे चॅनल असून सप्ताह काळात सप्ताहाचा कार्यक्रम कांगणे कव्हर करीत असल्याचे भासवत होता. यावेळी त्याने काही चुकीची माहिती संकलित केली. ही माहिती महंत रामगिरी यांच्या भक्तांपर्यंत पोहचली. अशी चुकीची माहिती प्रसिद्ध करू नये, अशी विनंती भक्त मंडळींनी केली.

मात्र कांगणे याने दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. यावेळी इतर काही मध्यस्थ व्यक्तीने कांगणेला समजावून सांगितले. मात्र कोणाचेही ऐकलं नाही. अखेर तडजोड म्हणून याप्रकरणी सव्वा कोटी रुपये देण्याचे ठरविण्यात आले. कांगणेने वैजापूर अथवा सराला बेटावर येण्यास नकार दिला. थेटे यांनीही डोंबवलीला जाण्यास नकार दिला. शेवटी यासाठी नाशिक ठिकाण निश्चित करण्यात आले.
दरम्यान ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर येऊन थेटे यांनी म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून सर्व माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांना सांगितली.

पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करीत कांगणेला अटक करण्याचे नियोजन केले. दरम्यानच्या काळात बॅगेत एक लाखाच्या खर्‍या खर्‍या नोटा लावून खाली एक कोटी 24 लाख रुपयांच्या बनावट नोटा भरल्या. याचवेळी पोलिसांनी पंच साक्षीदार देखील सोबत घेतले होते.
ठरल्याप्रमाणे म्हसरूळ परिसरातील एका हॉटेलमध्ये हे पथक पोहचत असताना कांगणेने आपण ठिकाण बदलल्याचे फोन करून सांगितले. तसेच जेलरोड परिसरातील कलानगर येथील रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये थेटे यांना बोलावले. त्यानुसार थेटे त्या ठिकाणी गेले तिथेच पंचासमक्ष कांगणेने पैसे घेताच पोलिसांनी छापा मारून कांगणेला ताब्यात घेतले.

पोलिसांनी कांगणेला अटक करून काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक येथील म्हसरूळ परिसरात आरोपीला अटक झाल्याची बातमी कळताच 10ते 15 तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले असून त्यांना रीतसर फिर्याद देण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक सांगळे यांनी सांगितले.
दरम्यान पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. ज्यांनी गंगागिरी महाराज संस्थानबद्दल खोटी माहिती आरोपीस दिली त्यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!