प्रशासनाच्या दिरंगाईचा गणेश मंडळांना फटका; देखावे दोनच दिवस रात्री बारापर्यंत खुले

0
नाशिक । गणेशोत्सव काळात शहरात किमान पाच दिवस रात्री 12 वाजेपर्यंत गणेश ध्वनीक्षेपक सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हा प्रशासनामार्फत दिली जाते.

मात्र यंदा पोलीस प्रशासनाकडून अहवाल येण्यास उशीर झाल्याने आणि त्यातही पोलीस प्रशासनाने सुचवलेले दोन दिवस उलटून गेल्याने गणेशभक्तांना आता केवळ दोनच दिवस रात्री 12 वाजेपर्यंत देखावे पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबतचे आदेश अद्यापही निर्गमित झालेले नाहीत.

गणेशोत्सवात रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिवक्षेपकांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे.

त्यानुसार नाशिक जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस प्रशासनाकडे अहवाल मागवला होता. या अहवालानुसार 26 ऑगस्ट, 29 ऑगस्ट म्हणजे गौरी आगमनाचा दिवस, 31 ऑगस्ट आणि अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांना परवानगी देण्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

त्यातील 26 ऑगस्ट आणि 29 ऑगस्ट हे दोन दिवस उलटल्यानंतर हा अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाल्याने आता उर्वरीत दोनच दिवस गणेशभक्तांना रात्री 12 वाजेपर्यंत देखावे पाहता येणार आहेत.

प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका गणेश मंडळांना बसणार आहे. महिनाभरापासून गणेश देखावे साकारण्यासाठी गणेश मंडळांची तयारी सुरू होती. त्यातच गणेश आगमनालाच पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने गणेशभक्तांचा हिरमोड झाला.

महिनाभर मेहनत करूनही गणेशभक्तांना त्याचा आनंदच घेता येणार नसेल तर काय उपयोग, अशा भावनेने गणेश मंडळांनीही प्रशासनावर नाराजी दर्शवली आहे. आता प्रशासनाने जे दोन दिवस सुचवले आहेत त्याबाबतचे आदेश अद्यापही देण्यात आलेले नाहीत.

LEAVE A REPLY

*