
नाशिक : शहरात प्रत्येकजण बाप्पांच्या आगमनासाठी तयारी करत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील वर्षी प्रमाणे यंदाही अनेकांनी इको फ्रेंडली गणेश साकारणार असल्याचे सांगितले आहे. तर बऱ्याच जणांनी पहिल्यांदाच इकोफ्रेण्डली पद्धतीने श्रीगणेशा करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे ही संकल्पना देशभर राबवली जात असताना महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी मराठी भाषेत संदेश असणारा एक फोटो ट्विट केला आहे. ‘मी दगडात नाही, मी देवळात नाही, मी झाडात आहे’ असा संदेश या फोटोमध्ये आहे. ‘झाडे लावा पाणी वाचवा’असा संदेशही देण्यात आला आहे.
महिंद्रांनी ट्विट मध्ये टाकलेल्या फोटोत एका झाडावरच गणपती साकारल्याचे दिसत आहे. अगदी हुबेहूब गणराय या झाडाचा आधार घेत साकारला आहे. खडूने सोंड काढून, कागदाचे दात बनवून, वर फेटा बांधून तर तळाच्या भागाला धोतर नेसवून आणि कान म्हणून सूप लावून गणराय साकारण्यात आले आहेत.
या सोबतच त्यांनी ट्विटद्वारे कॅनडामधील हाबर्ट रीव्स या वैज्ञानिकाचे एक वाक्य जोडले आहे. ते म्हणतात, माणसाला अनेकदा कळत नाही की त्याच्या हातून ज्या निर्सगाचा नाश होत आहे तोच देव आहे. आणि त्याचीच तो पूजा करत आहे. या फोटोबद्दल माहिती देताना हा मला व्हॉट्सअपवर फॉर्वडेड मेसेजमध्ये कोणीतरी पाठवल्याचे सांगितले. या आगळ्यावेगळ्या ग्रीन गणेशाबद्दल बोलताना महिंद्रांनी आपल्या आजूबाजूचा निर्सग आणि धार्मिक भावना जपण्याचा उत्तम संगम म्हणजे हा फोटो असल्याचे म्हटले आहे.