गुगलकडून रिलायन्स जिओमध्येही मोठी गुंतवणूक !
गॅजेट

गुगलकडून रिलायन्स जिओमध्येही मोठी गुंतवणूक !

७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आयटी क्षेत्रातील गुगल ही बलाढ्य कंपनी करणार आहे

Ramsing Pardeshi

मुंबई -

कोरोनामुळे देशाचे अर्थचक्र जरी थंडावले असले तरी देशातील बाजारपेठेबद्दल परकीय गुंतवणूकदारांमध्ये असलेले आकर्षण जराही कमी झालेले नाही. भारतामध्ये १० अब्ज डॉलर म्हणजे तब्बल ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आयटी क्षेत्रातील गुगल ही बलाढ्य कंपनी करणार आहे. त्याबाबतची घोषणा काल गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सुंदर पिचाई यांनी केल्यानंतर रिलायन्स जिओमध्येही गुगलकडून मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

गुगल फॉर इंडिया हा गुगल कंपनीचा व्यावसायिक प्रकल्प असून ही गुंतवणूक त्या अंतर्गत केली जाणार आहे. सुंदर पिचाई यांनी सांगितले की, गुगलने भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या भारतात एवढी मोठी गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. डिजिटल इंडियाबद्दलच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे गुगल कंपनीला मोठे पाठबळ मिळाले आहे. सुंदर पिचाई हे भारतवंशीय असून गुगलसारख्या बलाढ्य कंपनीच्या सीइओपदी त्यांच्या झालेल्या नियुक्तीने देशात सर्वांनाच अभिमान वाटला होता.

पिचाई यांना इकॉनॉमिक्स टाइम्सशी बोलताना जिओ प्लॅटफॉर्ममधील गुंतवणुकीसंदर्भात प्रश्‍न विचारला असता, त्यावेळी पिचाई यांनी होकारही दिला नाही आणि नकारही दिला नाही. ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार, गुगलकडून ४ अब्ज डॉलर म्हणजे ३० हजार कोटी रुपयांची मुकेश अंबानीची कंपनी जिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणुकीची शक्यता आहे. याबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. आत्तापर्यंत १.१८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक गुगलने केली असून जिओच्या गुंतवणुकीवर अखेरचे शिक्कामोर्तब झाल्यास, फेसबुकनंतर गुगलच सर्वाधिक भागिदारी असलेली कंपनी ठरणार आहे. जिओसोबत फसबुकने ९.९९ टक्क्यांची भागिदारी म्हणून ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आत्तापर्यंत जिओची भागिदारी विकून मुकेश अंबानी यांनी तब्बल १.१८ लाख कोटी रुपये कमावले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com