‘मुळा’च्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष : गडाख

0
सोनई येथे क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना माजी आमदार शंकरराव गडाख.

शेतकरी प्रश्‍नांपासून परावृत्त करण्यासाठीच पोलिसी खाक्या दाखविल्याचा मेळाव्यात आरोप

सोनई (वार्ताहर) – आगामी काळात शेतकर्‍यांसह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची हिंमत करू नये यासाठीच आम्हाला पोलिसी खाक्याची भीती दाखवली गेली असली तरी यापुढे कितीही वाईट परिस्थिती आली तरी पाणी, कर्जमाफी, हमीभाव आदी प्रश्नांवर गप्प राहणार नसल्याचा ठाम निर्धार क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला. सोनई येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याप्रसंगी गडाख बोलत होते. अध्यक्षस्थानी नेवासा बाजार समितीचे सभापती कडुबाळ कर्डिले होते. मुळा धरणातून आवर्तन मिळण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुळा एज्युकेशनच्या जागेचा प्रश्न तसेच शेतकरी आंदोलनाप्रकरणी न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकरवी निवासस्थानाच्या झडतीसह शोधमोहिमेच्या करण्यात आलेल्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना गडाख यांच्या निवासस्थान झडतीचा तीव्र शब्दांत निषेध केला.

यावेळी मेळाव्यास उपस्थितांसमोर भूमिका व्यक्त करताना गडाख म्हणाले की, राजकीय सूडाची परंपरा नेवासा तालुक्याला यापूर्वी कधीही नव्हती. मात्र गेल्या साडेचार वर्षांत विरोधी नेते व कार्यकर्त्यांचा पोलिसांकरवी बंदोबस्त करण्याचे गलिच्छ प्रकार वाढल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. नेवासा बुद्रुक येथील ज्ञानेश्‍वर तोडमल तसेच कांगोणी येथील राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांवर अशाच राजकीय सूड व दबावातून गंभीर स्वरूपाचे नाहक गुन्हे कसे दाखल झाले याचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

नेवासा, सोनई, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यांचा कारभार लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली अमानुषपणे चालवला जात असल्याचा गंभीर आरोप गडाख यांनी यावेळी केला. विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा वापर केला जात असल्याचा दावा केला. काही स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी ‘सुपारी’ घेऊन कामे करू लागल्याचा खळबळजनक आरोप गडाख यांनी यावेळी केला. यातूनच आपल्या निवासस्थानाची झडतीसह शोधमोहिमेचा ड्रामा रचला गेल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. शेतकरी सुकाणू समितीच्या आवाहनानुसार राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून वडाळा बहिरोबा येथील रास्ता रोकोत सहभागी झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी लोकप्रतिनिधींच्या खास मर्जीतील पोलीस अधिकारी बळाचा वापर करण्याची धमकी देऊन शेतकर्‍यांचे आंदोलन मोडीत काढू पाहत असल्याचे निदर्शनास आल्याने आपण स्वतः रस्त्यावर ठाण मांडून आंदोलकांना धीर दिल्याचे ते म्हणाले.
त्यावेळी वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या विनंतीला मान देऊन प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलन थांबवले.

परंतु याप्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करून कारवाईचा आग्रह धरूनही शांततेत आंदोलन पार पडल्याचे सांगून त्यावेळी पोलिसांनी सन्मानाने परत पाठवले. त्यानंतर अंधारात राजकीय कारस्थान करण्यात येऊन आपल्यासह 40 लोकांवर नियोजनबद्धरित्या गुन्हे नोंदविण्यात आल्याचा आरोप गडाख यांनी केला. या गुन्ह्याप्रकरणी घाईघाईने चार्जशीट तयार करून न्यायालयात दाखल करण्यात आले. न्याय व्यवस्थेचा आदर करून ज्या दिवशी मला न्यायालयासमोर हजर व्हायचे होते त्याच दिवशी भल्या सकाळपासूनच सोनई, शनिशिंगणापूर, नेवासा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात येऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांसह 200 ते 250 पोलिसांच्या ताफ्याकरवी नगरच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आल्याचा घटनाक्रम त्यांनी मांडला.

मुळा व भंडारदरा धरणांच्या नेवासा तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आग्रही राहिल्याने बाहेरील राजकीय शक्ती तालुक्याच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याच्या आरोपाचा गडाख यांनी यावेळी पुनरुच्चार केला. त्यातून तालुक्यातील दुष्ट प्रवृत्ती या राजकीय शक्तींच्या कच्छपी लागल्याने मुळा कारखाना, मुळा बँक, नेवासा बाजार समिती, मुळा एज्युकेशन आदी संस्थांना लक्ष्य करुन गडाख कुटुंबीयांवर वैयक्तिक आरोपांबरोबरच वैयक्तिक निंदानालस्ती करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्व संस्थांमागे चौकशीचा ससेमिरा लावूनही काहीच निष्पन्न न झाल्याने हतबल झालेल्या या लोकांकडून आता सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवल्याप्रकरणी खोटे गंभीर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सुरु असल्याचे ते म्हणाले. मात्र यामुळे अजिबात डगमगणार नसल्याचे नमूद करून तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यात लोकप्रतिनिधींना अपयश आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मुळा धरणातून तातडीने आवर्तन मिळावे यासाठी लवकरच तेवढ्याच शक्तीनिशी लढा उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मृत व्यक्तीवर गुन्हा
वाळू तस्करी करणार्‍या डंपरची धडक बसून युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाळू तस्करीला विरोध करणार्‍या ग्रामस्थांवर शासकीय कामात अडथळ्यासह गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. यामागे लोकप्रतिनिधींचा दबाव असल्याचा आरोप गडाख यांनी केला. लोकप्रतिनिधींची मर्जी सांभाळण्याच्या नादात सोनईच्या पोलीस अधिकार्‍यांनी या घटनेत मृत झालेल्या तरुणावरही गुन्हा दाखल केल्याचे गडाख यांनी स्पष्ट करताच उपस्थितांची मने हेलावली.

आवर्तनासाठी निवेदन
नेवासा तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पिण्याचे पाणी व चारा पिकांसाठी मुळा धरणातून आवर्तन सोडून साठवण बंधारे भरावेत या मागणीचे निवेदन शंकरराव गडाख यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

लढा सुरूच राहणार
पाण्याच्या प्रश्नावर आंदोलन केल्यामुळे गडाख हे चौकशीच्या फेर्‍यात सापडल्याने यापुढे ते या प्रश्नांवरून आंदोलने करतील की नाही अशी कुजबुज उपस्थितांत होती. परंतु शेतकरी प्रश्नांवरील आपला लढा यापुढेही तेवढ्याच जोमाने सुरू राहणार असल्याचा ठाम निर्धार गडाख यांनी बोलून दाखविल्याने उपस्थितांच्या आशा पल्लवीत झाल्या.

LEAVE A REPLY

*