Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

निर्णय चुकल्यास तालुक्याचा उन्हाळा निश्‍चित- यशवंतराव गडाख

Share

‘मुळा’ धरणाची अवस्था द्रौपदीसारखी; विधानसभा ‘क्रांतिकारी’कडूनच लढणार : शंकरराव गडाख

सोनई (वार्ताहर)- नेवासा तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाची अवस्था द्रौपदीसारखी झाली असून यापुढील काळात राजकीय निर्णय चुकल्यास तालुक्याचा उन्हाळा होण्याचा इशारा ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी राजकीय दिशा स्पष्ट करण्यासाठी सोनई येथे झालेल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या महामेळाव्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी, क्रांतिकारी शेतकरी पक्षातूनच आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार शंकरराव गडाख यांनी जाहीर करून त्यांच्या भाजप-सेना प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकला.

यावेळी ज्येष्ठ नेते गडाख म्हणाले, सर्वत्र राजकारणाची पातळी खालावली आहे. गेल्या 40-50 वर्षांत आमच्या पिढीतील कार्यकर्त्यांनी साखर कारखाना, शिक्षण संस्थांचे जाळे उभारताना रात्रीचा दिवस केला. रक्ताचे पाणी केले आणि आज कुठलीही कुवत नसलेले लोक ‘गडाख तालुक्याच्या विकासाला लागलेली कीड आहे’ असे बेछूट विधान करतात, तेंव्हा मनाला खूप वेदना होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. सरकारच्या निधीतून केल्या जाणार्‍या विकास कामांना आपणच केल्याची टिमकी वाजविणार्‍यांना सत्तेच्या माध्यमातून त्यांच्या स्वत:च्या गावात एखादी शाळा तरी काढता आली काय? याचे आत्मपरीक्षण करावे.

गेल्या तीस वर्षांतील अर्थकारण पाहिले तर मुळा कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना तब्बल 2300 कोटी रुपये मिळाले, ऊसतोडणी वाहतुकीच्या माध्यमातून 700 कोटी, कामगारांना 330 कोटी रुपये पगाराच्या माध्यमातून मिळाले, 250 कोटी रुपयांची संपत्ती कारखान्याच्या माध्यमातून सभासद शेतकर्‍यांच्या नावावर उभी राहिली, असे त्यांनी स्पष्ट केले. सहवीज प्रकल्प उभारणीचे जिल्ह्यात कोणी धाडस करत नसताना शंकररावांनी ते दाखविल्याने कारखान्याला 150 कोटी रुपये वीज विक्रीतून मिळाल्याचे सांगून वायफळ खर्च टाळण्यासाठी विश्रामगृह देखील पूर्वीच बंद करून टाकल्याकडे त्यांनी यानिमित्ताने लक्ष वेधले. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून 85 हजार विद्यार्थी तयार झाले, 2600 लोकांना रोजगार मिळाला, यासाठी आम्हाला काहीच कष्ट घ्यावे लागले नाहीत काय? आम्ही जर कीड असतो तर हे शक्य झाले असते काय? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘कीड’ तरी फवारणी करून घालवता येते पण ‘बांडगुळ’ अख्खे झाडंच फस्त करतंय त्याचे काय? असा सवाल आमदार मुरकुटेंना उद्देशून केला. पाठीमागे वळून एकदा आमच्या आणि तुमच्या कामांचे तुलनात्मक मूल्यमापन करून पाहा, लोकांचे प्रपंच कोणी उभे केले आणि त्यांना हवेत कोणी उडवले ते लक्षात येईल, असा टोला त्यांनी लगावला. आगामी काळात मुळा उद्योग समूहाच्या माध्यमातून 2500 सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

माजी आमदार शंकरराव गडाख यांनी तालुक्यात विकास कामांपेक्षा गडाख कुटुंबावर खालच्या पातळीवर जाऊन शिव्याशाप देण्याचे घाणेरडे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. आपण आमदार असताना धरणात अवघा साडेसहा टीएमसी पाणीसाठा असताना व धरण जिल्हाधिकार्‍यांच्या ताब्यात असताना राजकीय ताकद पणाला लावून प्रसंगी संबंधितांना ठणकावून त्यातून तालुक्यातील 350 साठवण बंधारे व तलाव भरून घेतल्याने भर दुष्काळातही पिकांचे पान वाळू न दिल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा
आ.बाळासाहेब मुरकुटे व विठ्ठलराव लंघे हे आपल्यात असताना भावासारखी वागणूक दिली. तेच माझ्यावर खोटे नाटे आरोप करत आहेत. माझ्यावर व कुटुंबावर आगामी काळात अधिक खालच्या पातळीवर टीका होणार आहे. परंतु कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा असे आवाहन शंकरराव गडाख यांनी कार्यकर्त्यांना केले.

‘बीड वॉटर ग्रीड’ला प्राणपणाने विरोध करणार
मराठवाड्याला पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली ‘बीड वॉटर ग्रीड’च्या गोंडस नावाखाली राज्यातील विविध धरणांतून पाईपलाईनद्वारे पाणी पळवण्याचा डाव अंतिम टप्प्यात शिजत आला आहे. मुळा धरणातूनही दोन टीएमसी पाणी नेण्याचे नियोजन आहे. ‘समन्यायी’च्या आडून पाणी घ्यायचे; वरून बीड वॉटर ग्रीडच्या माध्यमातूनही न्यायचे. हा गोरखधंदा खपवून घेणार नसून त्यास प्राणपणाने विरोध करणार असल्याचा निर्धार माजी आमदार शंकरराव गडाख यांनी यावेळी व्यक्त केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!