ग्रा.पं. साठी सरासरी ८० टक्के मतदान

१२२१ उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद, उद्या मतमोजणी

0

नाशिक | दि. ७ प्रतिनिधी- जिल्ह्यातील १५० ग्रामपंचायतींसाठी आज मतदान घेण्यात आले. या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्सुकता दिसून आली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ८० टक्के इतके उच्चांकी मतदान झाले.

प्रथमच सरपंचपदासाठी थेट मतदान घेण्यात आल्याने या पदासाठी चुरस दिसून आली. १५० ग्रामपंचायतींसाठी १२२१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून या उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. उद्या (दि. ९) मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यातील १७१ ग्रामपंचायतींपैकी २० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे १५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यातील दिंडोरी तालुक्यातील वनारसे ग्रामपंचायतीसाठी एकही नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने १५० ग्रामपंचायतीसाठी आज मतदान घेण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते.

ग्रामपंचायत निवडणूकिसाठी यंदा मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हयात सरासरी ८० टक्के मतदान झाले. १५० ग्रामपंचायतीसाठी १२२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात झाली. सकाळी ७ः३० ते ९ः३० या वेळेत ३ लाख ३६ हजार ७५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पहील्या सत्रात दोन तासात १४.८६ टक्के इतके मतदान झाले.

सकाळी ११ः३० वाजेपर्यंत ३४.९४ टक्के मतदान झाले. दुपारच्या सुमारास मतदान केंद्रावरील गर्दी काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले असले तरी मतदारांमधील उत्साह मात्र कायम होता. दुपारी १ः३० वाजेपर्यंत ५१.५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.या दरम्यान १ लाख ७१ हजार ९२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ३ः३० वाजेपर्यंत ६९.७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

दुपारंनतर मात्र मतदान केंद्रावर गर्दी वाढू लागली. त्यामूळे सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून आले. जिल्हयात सरासरी ८० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

पावसामुळे व्यत्यय
आज दुपारच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणूक मतदानावर दिसून आला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने यामुळे मतदान केंद्रावरील गर्दी कमी झाली. मात्र, दुपारी ४ वाजेनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने पुन्हा मतदान केंद्रावर गर्दी वाढू लागली. त्यामुळे दुपारी ४ः३० वाजता मतदानाची वेळ संपूनही काही केंद्रावर ६ः३० वाजेपर्यंत मतदान सुरू असल्याचे दिसून आले.

 

LEAVE A REPLY

*