जवानासह पत्नीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

‘सीआयएसएफ’च्या जवानांकडून मानवंदना

0
सिन्नर | दि. २ वार्ताहर – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सहकारी जवानाने केलेल्या गोळीबारात मृत झालेल्या तालुक्यातील चिंचोली येथील जवान राजेश केकाण व त्यांची पत्नी शोभा केकाण यांच्यावर आज (दि.२) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. व्ही. एन. नाईक संस्थेच्या प्रांगणात झालेल्या अंत्यविधीप्रसंगी सीआयएसएफच्या जवानांनी केकाण यांना मानवंदना दिली.

काश्मीरच्या किश्तवाड येथील सीआयएसएफच्या कर्मचारी वसाहतीत सहकारी असलेल्या सदस्याने स्वतःच्या पत्नीवर व त्यानंतर केकाण यांच्या घरात येऊन दोघांवर सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळ्या झाडल्या होत्या. यात केकाण दांम्पत्यासह तिघांचाही मृत्यू झाला होता. तर त्यांची दोन मुले या हल्ल्यातून मात्र वाचली होती.

राजेश व त्यांची पत्नी शोभा यांचे पार्थिव शुक्रवारी (दि.१) दुपारी काश्मीर येथुन विशेष विमानाने मुंबईला रवाना करण्यात आले होते. रात्री उशीरा मुंबई विमानतळ येथून वाहनाने हे पार्थिव चिंचोलीकडे पाठविण्यात आले. आज (दि.२) सकाळी ८ वाजेच्या सुमारास राजेशचा सैन्यदलात असणारा भाऊ गणेश हे पार्थिव घेऊन गावात पोहचला. त्याच्यासोबत राजेशच्या पलटणीतील धर्मपाल सोमकुमार, बीपीन कुमार हे वरिष्ठ अधिकारी होते.

सकाळी ९ वाजेला शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केकाण यांचा भाऊ गणेश व मुलगा आर्यन यांनी त्यांना मुखाग्नी दिला. अंत्यसंस्काराप्रसंगी नाशिक येथील इंडिया सिक्युरीटी प्रेसमधील सीआयएसएफच्या तुकडीतील जवानांनी यावेळी मानवंदना दिली. आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समितीचे माजी गटनेते उदय सांगळे, तहसिलदार नितीन गवळी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात श्रध्दांजली वाहीली. अंत्यविधीला हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्य सुनिता सानप, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, सरपंच एकनाथ झाडे, उपसरपंच सुगंधा लांडगे, माजी सरपंच संजय सानप, पोलिस पाटील मोहन सांगळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजु नवाळे, शालेय समिती अध्यक्ष दत्तु नवाळे, सुदाम नवाळे आदींसह ग्रामस्थांनी अंत्यविधीसाठी उपस्थित होते. शाळेच्या आवरासमोरच्या पटांगणावर वाढलेली काटेरी झुडुपे, गवत गावातील तरुणांनी रातोरात साफ करून अंत्यविधीला येणार्‍यांसाठी बसण्याची व्यवस्था केली होती.

LEAVE A REPLY

*