मैत्रोत्सवासाठी आज तरुणाईचे ‘चीरतरुण’ बेत

0
नाशिक । नील कुलकर्णी

तुझ्याविना मैत्रीचा जिव्हाळा, म्हणजे माझ्यासाठी जणू उन्हाळ्यातही पावसाळा।

तुझी मैत्री म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं जाळीदार पान,

जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जात,

तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं।

मैत्रीचा हा धागा असाच जपून ठेव, तू हसत रहा आणि दु:ख माझ्यांआड लपून ठेव।,

अशा तरल भावस्पर्शी कवितांमधून ‘मैतर जीवांचे’ आपल्या भावना रविवारी व्यक्त करणार आहे. त्याला निमित्तही तसेच आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिला रविवार जगभर मैत्रीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.

सळसळते चैतन्य आणि अमाप उत्साहाची ऊर्जा असलेल्या तरुणाईसाठी तर हा दिन म्हणजे मैत्रोत्सवच. आजच्या दिवसाला अविस्मरणीय बनवण्यासाठी कुणी निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचे बेत रचले तर कुणी मैत्रीचा धागा बांधण्यासाठी तरुणाईचे ‘हॉट आणि फेव्हरेट’ डेस्टीनेशन असलेल्या चीरतरुण कॉलेजरोडवर धमाल मौजमजा करर्‍याचे ठरवले.

नाशिक शहराच्या जवळील सोमेश्वर धबधबा, दुगारवाडीचा रम्य परिसर, गंगापूर धरण, अंजनेरी, भंडारदरा, चामारलेणी आणि पांडवलेणी या ठिकाणी तर मैत्रीच्या स्नेहसंमेलनाला भर येत असतो. ंयंदाही तरुणाई मैत्रीचा दिवस साजरा करण्यासाठी याच ठिकाणी गर्दी करणार हे नक्की.

राखी पौर्णिमा आणि मैत्र दिन लागूनच आल्यामुळे राखी आणि फे्ंरडशिप बॅण्ड विक्रेत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

भेटकार्ड किंवा शुभेच्छा पत्र देण्याची पूर्वीची फॅशन सोशल माध्यमांमुळे जरी कमी झाली असली तरी ‘टेक्नोसॅव्ही’ पिढी सामाजिक माध्यमांचा खुबीने वापर करून आपल्या भावना दोस्त कंपनीला पाठवत हा दिन साजरा करणार आहे.

मैत्रदिनाच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या सोशल माध्यमांवर मित्रप्रेमाचे संदेश देणारी लाट फारशी दिसली नाही तरीही हा दिवस वास्तवात साजरा करण्यासाठी तरुणाईचा उत्साह तसुभरही कमी झाला नाही.

आया मौसम दोस्ती का…..
खाऊ -पिऊ मौजमजा करू, ही तरुणाईची कुठलाही दिवस साजरा करण्याची नवी फॅशन होऊ पाहत आहे. त्यामुळे कॉलेजरोड, गंगापूर रोड, अशा ठिकाणी हॉटेल्स, कॉफी हाऊसमध्ये या दिवसाच्या निमित्ताने विशेष खाद्यपदार्थांची रेलचेल दिसून आली. काही ठिकाणी झुंबा तसेच नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मैत्रदिनाला मानवता आणि सामाजिक जाणिवांची झालर देण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी अभिनव बेत आखले आहेत.

मैत्रोत्सव असाही..
मैत्रीचा धागा बांधून हे नाते वृद्धिंगत करताना दिसणार्‍या तरुणाईसोबतच, काही पर्यावरणप्रेमी झाडे, नदी, तलाव तसेच निसर्गाचा भाग असलेल्या घटकांना मित्र मानून मैत्रीचा धागा बांधणार आहे. यासोबतच पशूपक्षी, पुस्तके यांना मित्र मानणार्‍यांची संख्याही कमी नाही. त्यामुळे मैत्रदिनाचा नवा पायंडा पडताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

*