Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारमित्राने केला मित्राचा खून

मित्राने केला मित्राचा खून

महामार्गावरील खूनाचा छडा लावण्यात स्थानिक अन्वेषण शाखेला यश,तिघांना अटक 

नंदुरबार 

केबीसी  मध्ये 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत टॅक्सच्या स्वरुपात  चार ते साडे चार लाख रुपये उसनवार व कर्ज घेवून फोन पे द्वारे भरुन फसवणूक झाली. सदर फसवणूक झालेल्या पैशांची भरपाई व्हावी, यासाठी ट्रकमधील सळई विक्री करण्याच्या उद्देशाने मित्रानेच मित्राचा खून केल्याची कबुली देण्यात आली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी तिघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने  अटक केली आहे. दोन दिवसांपुर्वी घडलेल्या खुनाचा तपास अवघ्या काही तासात लावण्यात पोलीसांना यश आले.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रदेव ओमप्रकाश यादव (24, रा.अमारी शिवगड ता.लंबुवा उत्तर प्रदेश) हा सुनील गिरधारीलाल गुप्ता यांच्याकडे चालक म्हणून कामाला होता.

दि.22 ते 24 डिसेंबर दरम्यान, ट्रक चालवत असलेल्या इंद्रदेव यादव याचा खून करून त्याचा मुतदेह सुरत-धुळे महामार्गावर असलेल्या मोरकारंजा शिवारातील रस्त्यावर असलेल्या नाल्यात फेकून दिला. तसेच ट्रक सोनखांब जवळील शेर ए पंजाब हॉटेलवर सोडून पळून गेला. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात ट्रान्सपोर्ट मालक सुनील गुप्ता यांनी फिर्याद दिली होती.

याबाबत ट्रान्सपोर्ट मालकाला विचारपूस केली असता त्याने सांगितले की, मयत इंद्रदेव यादव याने फोन करुन सांगितले की, त्याचे ओळखीचे गावाकडील मुंबईमध्ये राहणारे 3 मित्र त्याच्या सोबत नेरी ता.एरंडोल जि.जळगांव येथून सोबत येणार असून ते सुरत येथे येणार असल्याबाबत माहिती दिली.

परंतु खुनाचा गुन्हा घडला त्यावेळेस ते तिन्ही मित्र कुठेही दिसून आले नाही, म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांचा तिन्ही मित्रांवर संशय आला. याबाबत आरोपीतांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथक तयार करुन मयताचे मुळ गांव उत्तर प्रदेश, सुरत व मुंबई येथे रवाना करुन शोध घेण्यास सुरुवात केली.

आरोपीतांचा सर्वत्र शोध घेत असतांना मुंबई येथे गेलेल्या पथकास गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार मानसिंग बैजनाथ वर्मा रा.आत्मज रत्नागरपुर पाटी धरवली प्रतापगढ़, उत्तर प्रदेश यास माहुल गांव, मुंबई येथे बेड्या ठोकण्यात यश आले.

त्यास प्राथमिक विचारपुस केली असता त्याने गुन्ह्यात त्याचे आणखी दोन साथीदार असून ते देखील मुंबईतच असल्याची माहिती दिली. पथकाने दि.25 डिसेंबर रोजी रात्री संजय रामशंकर वर्मा रा. कैथापुर लंभुआ सुलतानपुर,उत्तर प्रदेश यास माहिम येथील पाण्याच्या टँकर एजन्सीमधून पाण्याच्या टँकरमध्ये झोपलेला असतांना तर गुन्ह्यातील तिसरा आरोपी विजय भगीरथी वर्मा रा. गौरा सुलतानपुर,उत्तर प्रदेश यास भिवंडी बायपास जवळील एका हॉटेलमधुन ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले.तिन्ही आरोपीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत आणुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून खून का केला याबाबत विचारपूस केली असता अतिशय धक्कादायक माहिती समोर आली.

गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार मानसिंग बैजनाथ वर्मा यास केबीसी  मध्ये 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत टॅक्सच्या स्वरुपात  चार ते साडे चार लाख रुपये उसनवार व कर्ज घेवून फोन पे द्वारे भरले होते.

परंतु आपल्याला 25 लाख मिळत नाही. या सर्व प्रकारातून फसवणूक झाली असल्याचे लक्ष्यात आल्यानंतर ज्यांच्याकडून उसनवारीने पैसे घेतलेले होते ते लोकंदेखील त्याच्याकडे पैश्यांचा तगादा लावत होते म्हणून त्याने पैसे कोणत्या ना कोणत्या मार्गाने परत मिळवायचेच असा निर्णय घेवून हे कृत्य केले.

आपल्या गावाकडील इंद्रदेव ओमप्रकाश यादव याला नेरी ता.एरंडोल जि.जळगांव येथे येवून भेट तेथून सोबत सुरत येथे जावू, ठरल्याप्रमाणे मानसिंग व त्याच्या आणखी 2 इसम मयत इंद्रदेव यास नेरी ता.एरंडोल येथे भेटले.

बर्‍याच दिवसानंतर गावाकडील मित्र भेटल्यानंतर चारही मित्रांनी एरंडोल येथे जेवण केले. त्याचदरम्यान आरोपी मानसिंग शर्मा याच्या डोक्यात विचार आला की, मयत इंद्रदेव याचे ट्रकमधील सळई विकून पैसे आपले गेलेले पैसे जमविता येतील.

त्याने ही गोष्ट त्याचा मित्र मयत इंद्रदेव यास सांगितल्यानंतर त्याने नकार दिला. इंद्रदेव सुरत येथे जावून आपले बिंग फोडेल या भितीने तिन्ही मित्रांनी इंद्रदेव यास दि.23 डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळेस झोपलेला असतांना त्याच्याच रुमालाने गळा आवळून जिवेठार केले. तेथुन धुळेकडे रवाना झाले.

धुळे येथील बर्‍याच व्यापारी व भंगार घेणार्‍या लोकांना संपर्क करुनदेखील सळई घेण्यास कोणी तयार होईना. घाबरलेल्या अवस्थेत मयत इंद्रदेव यास गाडीत झोपवून तिन्ही मित्रांनी गाडी विसरवाडीच्या दिशेने घेतली.

दि.24 रोजी पहाटेच्या सुमारास कोंडाईबारी घाटाच्या पुढे मोरकरंजा गावाजवळ एका दरीत तिघांनी मिळून इंद्रदेव याचा मृत्युदेह एका नाल्यात फेकुन ट्रक शेर-ए-पंजाब हॉटेलवर लावून तेथून पळ काढला. याबाबत गुन्ह्याची सविस्तर कबुली देवुन गुन्ह्याचा पुढील तपासकामी तिन्ही आरोपीतांना विसरवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पोलीस नाईक प्रमोद सोनवणे, राकेश वसावे, शांतीलाल पाटील मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या