सात जिल्हे व पाच राज्यांत तरुणांची फसवणूक करणारे जेरबंद

0

50 लाख 92 हजार रुपये जप्त, सायबर शाखेची कामगिरी; राहुरीच्या फिर्यादीमुळे गुन्ह्याची उकल

 हस्तगत केलेला मुद्देमाल – 12 मोबाईल, 24 सीम, चार पेनड्राईव्ह, एक लॅपटॉप, 19 एटीएम कार्ड, 6 पासबुक, 2 परवाने 3 पॅनकार्ड, 2 मतदानकार्ड, 2 आधारकार्ड, 10 बँक चेकबुक, एक पासपोर्ट, रोख सहा हजार असा 91 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तर आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या बँक अकाउंटमध्ये 50 लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी) – बाबा रामदेव यांच्या पतंजलि  कंपनीची उत्पादने विक्री करणारी एजन्सी घेण्यासाठी राहुरीच्या एका तरुणाने ऑनलाईन अर्ज केला होता. मात्र तीन लाख रुपये देऊन देखील एजन्सी दिली नाही. याप्रकरणी देविदास हैसिंग दहीफळे (रा. राहुरी) यांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांनी पाटणा येथून आरोपी विकासकुमार यास अटक केली आहे. तर संदीपकुमार, संतोषकुमार व अमितकुमार (रा. कैलास अपार्टमेंट, पाटणा) यांची नावे निष्पन्न केली आहेत. विकासकडून 50 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपींनी महाराष्ट्रातील नगरसह सात जिल्हे व संपूर्ण देशातील पाच राज्यांत तरुणांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पतंजलिची एजन्सी हवी म्हणून दहिफळे यांनी 3 ऑगस्ट 2017 रोजी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरला होता. ही माहिती भरून टोलफ्री क्रमांकावर फोन केला असता त्यावर राघवेंद्र नामक व्यक्तीने पतांजली आयुर्वेद लिमिटेडमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही पतांजली एजन्सी घेऊ इच्छिता का? अशी हिंदीत विचारणा केली.

दहीफळे यांनी सहमती दर्शविली असता राघवेंद्र यांनी रजिस्ट्रेशनसाठी 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यासाठी पंजाब नॅशनल बँकेचा खातेक्रमांक देण्यात आला. दहीफळे यांनी दि. 3 ऑगस्ट रोजी ही रक्कम बँकेतून खात्यावर आदा केली. नंतर सिक्युरिटी म्हणून दोन लाख 75 हजार रुपयांची मागणी केली.

5 ऑगस्ट रोजी ही रक्कम देखील खात्यावर जमा करण्यात आली. त्यानंतर राघवेंद्र यांनी दहीफळे यांना पतंजलि डिलरशीपचे नकली पत्र पाठविले. हा प्रकार उघड झाल्यामुळे बुधवारी दहीफळे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात संपर्क साधला. हा प्रकार माहिती तंत्रज्ञात कायद्यांतर्गत असल्यामुळे त्यांना नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यास सांगितले.

याप्रकरणी फिर्यादीनुसार सायबर शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक कीर्ती पाटील यांनी काही तांत्रीक बाबींच्या माध्यमातून आरोपींपर्यंत पोहचण्याच्या प्रयत्न केला. सायबरचा गुन्हा असल्यामुळे त्याची खरी ओळख पटणे शक्य नव्हते, मात्र पोलिसांनी मुख्य आरोपी विकासकुमार हा पाटणा येथील कैलास अपार्टमेंट येेथे राहत असल्याचे निष्पन्न केले.

पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखली एक टीम पाटणा येथे रवाना करण्यात आली. आरोपीस अटक करुन त्याच्या ताब्यातून तब्बल 51 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. त्याला नगरमध्ये आणले असता चौकशी केली असता त्याने सांगितले की,

नव्याने पास झालेल्या तरुणांना नोकरीचे आमिष दाखविणे, टॉवरसाठी जागा पाहिजे म्हणून फसवणूक करणे, डिलरशीप देणे, मोठ्या महाविद्यालयात प्रवेश देणे अशी विविध कारणे सांगून फसवणूक केल्याची कबुली देण्यात आली. या कामात त्याचे सहकारी देखील त्यास मदत करीत असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांची नावे पुढे आल्यामुळे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले.

या आरोपींकडून अणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुमार यास पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळावी म्हणून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा,

अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार, कीर्ती पाटील, प्रतीक कोळी, महादेव माळवदे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे राहुल गुंड, अरुण सांगळे, आकाश भैरट, प्रशांत राठोड, देशमुख, बडे, आंधळे, राजू गव्हाणे, संदीप लहाने, योगेश दायजे, खरपुडे, शेख यांच्या पथकाने केली.

शर्मा यांच्या शाखेची फलनिष्पत्ती – पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्ह्यात आल्यानंतर पहिले सायबर शाखेचे काम हाती घेतले होते. या शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर आठ गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. तर सात ते आठ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. केवळ चार कर्मचार्‍यांच्या बळावर अशा प्रकारची कामगिरी केल्यामुळे या शाखेचे कौतुक होत आहे. आरोपींकडून 20 पेक्षा जास्त गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी कामगिरी या शाखेकडून होत असल्यामूळे शर्मा यांनी उभी केलेल्या शाखेची फलनिष्पत्ती ठरत आहे.

 

LEAVE A REPLY

*