बनावट कागदपत्रे तयार करून डॉ. कांकरीया यांची फसवणूक

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – बनावट कागदपत्रे तयार करुन भूखंडाचे आरक्षण उठवून देण्याचे अमिष दाखवून डॉ. प्रकाश कांकरीया यांची 75 लाख रुपयांस फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी डॉ. कांकरीया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबईच्या दोन व्यापार्‍यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पवन चंदूलाल खोमाणी व चंदूलाल खोमाणी अशी दोघांची नावे आहेत.
नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरीया यांचा भिंगार येथे स्वतच्या मालकीचा आरक्षीत भूखंड आहे. या भूखंडावरील आरक्षण उठवून देतो असे आरोपींनी डॉ. कांकरिया यांना सांगितले. त्यापोटी 75 लाख रुपये लागतील असे त्यांना सांगण्यात आले होते. भूखंडावरील आरक्षण उठविण्याचे आमिष दाखविल्यामुळे डॉ. कांकरिया यांनी आरोपींना वेळोवेळी लाखो रुपयांची पूर्तता केली. मात्र, आरोपींनी त्यांना कोणतीही कागदपत्रे दिली नाहीत. डॉ. कांकरिया यांनी तगादा लावल्यानंतर त्यांना बनावट कागदपत्रे देण्यात आली.
या दरम्यान, त्यांच्याकडून 75 लाख रुपये घेण्यात आले होते. इतकी मोठी रक्कम देऊन देखील या जागेवरील आरक्षण उठले नाही. ही बाब डॉ. कांकरिया यांच्या लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी त्यांनी गुरुवारी (दि.13) पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी घटनेतील सत्यता लक्षात घेऊन मुंबईच्या दोन व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार करीत आहेत.

  तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात घटनेचा योग्य तपास करण्यात येणार आहे. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून इतकी मोठी फसवणूक झाल्यामुळे या तपासाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती तपासी अधिकारी अभय परमार यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*