Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

परळी पिपल्स अर्बन मल्टिस्टेटमध्ये साडेअकरा कोटींचा अपहार

Share

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – परळी पिपल्स अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये तत्कालिन व्हा. चेअरमन, जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतरांनी संगनमत करून तब्बल 11 कोटी 42 लाख 40 हजार आठशे दहा रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाल्याने याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी पिपल्स अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये बेलापूर येथील संजय दत्तात्रय शिंदे (वय 52, रा-बेलापूर बुद्रुक, ता.श्रीरामपूर) यांनी त्यांची एक लाख रुपयांची ठेव ठेवली होती. त्यांच्या ठेवीची मुदत संपली असता त्यांनी आपल्या ठेवीची रक्कम काढण्यासाठी परळी पिपल्स अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये अनेक चकरा मारल्या. त्यांना अधिकार्‍यांकडून प्रत्येकवेळी वेगवेगळी उत्तरे मिळाली. त्यामुळे संस्थेचे चेअरमन नितीन घुगे यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी सध्या थोडी अडचण आहे, असे सांगुण खोटी अश्‍वासने दिली. नंतर चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व जनरल मॅनेजर यांनी आपले फोन घेणे बंद केले. त्यामुळे आता आपली ठेवीची रक्कम परत मिळणार नाही, अशी भिती वाटत आहे.

दरम्यान मी संस्थेच्या लेखापरिक्षणाबाबत माहिती घेतली असता सनदी लेखापाल प्रसाद कुलकर्णी (अहमदनगर) यांनी या संस्थेचे सन 2018-19 चे लेखापरिक्षण केले. व त्याचा रिपोर्ट संस्थेला सादर केला आहे. संस्थेकडून ऑडीट रिपोर्टची प्रत मिळविली असता त्यात तत्कालिन उपाध्यक्ष (विद्यमान अध्यक्ष), नरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतरांनी संगनमत करुन तब्बल 11 कोटी 42 लाख 40 हजार आठशे दहा रुपयाचा अपहार केला. या पदाधिकारी व अधिकार्‍यांनी संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांमधून ठेवीदारांच्या रकमा इतर बँकेमध्ये वर्ग करुन अपहार केल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी संजय दत्तात्रय शिंदे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पतसंस्थेचे तत्कालिन व्हाईस चेअरमन व सध्याचे चेअरमन नितीन सुभाष घुगे (रा. टेलीफोन ऑफीसजवळ, शेवगाव- पाथर्डी रोड, शेवगाव), जनरल मॅनेजर विश्वजित राजेसाहेब ठोंबरे (देशमुख पेट्रोल पंपासमोर, केज, जि. बिड), मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलेश शिवकुमार मानुरकर (रा. मारुती मंदिरासमोर, बोधेगाव, ता. शेवगाव), प्रमोद किसन खेडकर (रा. पवई, जि. ठाणे), श्रीरामपूर शाखाधिकारी अमेय गोडसे यांच्यासह या अपहाराशी संबंधित शाखाधिकारी व कॅशिअर यांच्या विरोधात गु. र. नं. 188/2020 प्रमाणे भा. दं. वि. कलम 420, 468, 471, 34 तसेच सहकार महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनांमधील) हितसंबंधांचे संरक्षण करण्याबाबद अधिनियम 1999चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अहमदनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी करीत आहेत.

ठेवीदारांना न्याय मिळवून देणार
संस्थेच्या घोटाळ्यामध्ये जे-जे दोषी आहेत त्यांच्या मालमत्ता एमपीआयडी (महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबधाचे संरक्षण अधिनियम 1999) अन्वये जप्त करून घेण्यासाठी व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी लवकरात लवकर मिळण्यासाठी न्यायालयीन लढा उभारणार असून त्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत.
योगेश बबन म्हस्के,
माजी चेअरमन, परळी पिपल्स अर्बन मल्टिस्टेट.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!