पल्स पॉलिसीतून दामदुप्पटच्या अमीषाने, लाखो रुपयांची फसवणूक

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील वैदुवाडी परिसरात राहणार्‍या गोर गरिब नागरिकांना पल्स पॉलिसीच्या माध्यमातून दमदुप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखविण्यात आले होते. त्यातून 12 जणांनी अनेक गरिबांना लाखो रूपयांना लुटल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तु शंकर बडे (रा. पाईपलाईन रोड), मँऩेजर डुब्रेकर, शिवाजी कारभारी शिरसाठ (रा. बोल्हेगाव) व निर्मलासिंग बंगु, सुब्रेला भट्टाचार्य, अनिल चौधरी या सहा जणांसह अन्य 12 जणांना आरोपी करण्यात आले आहे.

आरोपी यांनी वैदुवाडी परिसरात जाऊन गोर गरिब व अज्ञान तसेच निराधार व्यक्तींना पल्स पॉलिसीची खोटी माहिती देऊन दिलेल्या रकमेच्या दामदुप्पट रक्कम करुन देऊ असा सांगून पैसे गुंतविण्यास भाग पाडले. काही नागरिकांना नकार दिला असता त्यांना पैशाचे अमिष दाखविण्यात आले. आरोपींवर विश्‍वास ठेऊन अविनाश मारुती शिंदे, मुशली गोरख धनगर, मुशली हुसेन धनगर, सुरेखा संतोेष शिंदे, उषाबाई सुरेश शिंदे, उषा रामा शिंदे, नवनाथ मारुती धनगर, संतोेष बाबाजी धनगर, तारा सुरेश धनगर अशा काही नागरिकांनी हजारो रुपयांचा भरणा सुरू केला होता.

ठरलेल्या कालावधीत दाम दुप्पट होण्याची वेळ जवळ आली होती. तक्रारदार सर्व महिने हप्ता भरत होते. मात्र काही दिवसानंतर आरोपी हप्ता घेण्यास आले नाही. त्यामुळे तक्रारदारांनी कार्यलयात जाऊन पाहिले असता त्याला कुलूप दिसले. आरोपींना फोन केला असता त्यांनी उत्तर दिले नाही. तसेच काही वेळा संपर्क झाला असता त्यांनी टाळाटाळ केली.

काही दिवस आरोपींना पैशाची मागणी केली असाता त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. याप्रकरणी नवनाथ धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात 12 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल चिंतले करीत आहेत. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

तिघांची चौकशी सुरू आहे
नागरिकांनी अशा पद्धतीने पैशाची गुंतवणुक करणे चूक आहे. खात्रीशीर ठिकाणी किंवा विश्‍वासू व्यक्तीशी व्यवहार केले पाहिजे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
– राकेश मानगावकर (पोलीस निरीक्षक)

LEAVE A REPLY

*