छावणी घोटाळ्यातील बड्यांना बुडबुडा

0

फौजदारी कारवाईसंदर्भात तहसीलदारांना फेरआदेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरसह राज्यातील अन्य चार जिल्ह्यांत 2012-13, 2013-14 अशी दोन वर्षे पडलेल्या दुष्काळात पशुधन वाचविण्यासाठी चारा डेपो, चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या छावण्या, चारा डेपोत कोट्यवधी रुपयांची अनियमितता, गैरप्रकार झालेला आहे. याप्रकरणी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात चारा छावणी व चारा डेपोत अनियमितता केलेल्या चालकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सहकारातील अनेक बडे मासे अडकलेले असून जिल्हा प्रशासनाच्या आदेशामुळे त्यांना चांगलाच बुडबुडा आला आहे.

सप्टेंबर महिन्यात नगर, बीड, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील एक हजार 273 ठिकाणी छावण्या आणि चारा डेपो सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी छावणी अथवा चारा डेपो चालविण्यास घेतलेल्या संस्थांनी वेगवेगळ्या प्रकाराची अनियमिता केलेली आहे. महसूल विभागाने केलेल्या तपासणीत हे समोर आले होते.

यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी या छावणी-चारा डेपो चालकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दोन संस्थांवर थेट पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. हे प्रकरण राज्य सरकार पातळीवर व उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार राज्य सरकारच्या अवर सचिवांनी 6 सप्टेंबरला चारा छावण्या आणि डेपोत अनियमितता करणार्‍या संस्थांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश संबंधीत जिल्हाधिकार्‍यांना दिले होते.

त्यानूसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील आठ तहसीलदारांना पत्र पाठवून 426 छावणी आणि चारा डेपो चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, काही तहसीलदारांनी शंका उपस्थित करत जिल्हाधिकारी यांचे पुन्हा मार्गदर्शन मागवले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने गुन्हा दाखल करण्याबाबत पुन्हा तहसीलदार यांना मार्गदर्शन केलेले आहे.

दरम्यान, या घोटाळ्यात आठ तालुक्यातील असंख्य बडे मासे अडकलेले आहेत. या सर्वांवर आता पोलिसात गुन्हे दाखल होणार असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अनियमिता करणार्‍या संस्थांमध्ये बहूतांशी संस्था या सहकारातील असून आता या संस्थांच्या तत्कालीन पदाधिकारी आणि संचालक मंडळावर कारवाई होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत मुक्या जनावरांच्या तोंडचा घास पळवणार्‍यांचे धाबे आता दणाणले आहेत. यासह सहकार खात्या मार्फत या संस्थावर स्वतंत्र कारवाई करण्यात येणार आहे.

फौजदारी कारवाई होणार्‍यामध्ये नगर तालुक्यातील 71, पारनेर 41, पाथर्डी 32, शेवगाव 33, कर्जत 132, श्रीगोंदा 81, जामखेड 27, नेवासा 9 छावण्या व चारा डेपोंचा समावेश आहे.
अनियमितता करणार्‍या संस्थांमध्ये बाजार समित्या, सहकारी सोसायट्या, पतसंस्था, विविध प्रतिष्ठाने, सार्वजनिक वाचनालये, सहकारी दूध उत्पादन संस्था, समाज प्रबोधन संस्था, मजूर संस्था, बचत गट, मेंढीपालन संस्था, स्वतंत्र्य सैनिक संस्था, शिक्षण संस्था यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*