Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

तोतया मेजरकडून साडेआठ लाखांचा गंडा

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये’ अशी एक म्हण हिंदीमध्ये आहे. या म्हणीचा प्रत्यय एका तोतया मेजरने अनेकांना घातलेल्या गंड्यांतून आला आहे. 5 फेब्रुवारीला माळीवाडा बसस्थानकावर तोतया मेजरला पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले. त्यानंतर त्यांच्या अनेक करामती समोर आल्या. दोघींसमवेत लग्न, नोकरीचे अमिष दाखवीत लुुटणे असे प्रकार त्याने केल्याचे चौकशीत समोर आले.

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत भंगाळे या गुन्ह्याचा तपास करत आहे. तपासात प्रगती होत असताना या मेजरने अनेकांना फसविले असल्याची यादी पुढे येत आहे. त्याने दोन महिलांना मेजर असल्याची बतावणी करून त्यांच्यासोबत लग्न केले. त्यांचे दागिने बँकेत गहाण टाकून लाखो रुपयांना गंडा घातला. नोकरीसाठी व्याकूळ झालेल्या सहा तरुणांना लाखोंचा गंडा घातला. यासाठी मेजरने सर्वकाही बनावट गोष्टीचा वापर केला आहे.

धिप्पाड शरीरयष्टी असलेला एक इसम माळीवाडा बसस्थानक परिसरात असल्याचे लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्या राजाराम गवळी यांच्या लक्षात आले. परंतु, त्याने परिधान केलेली वर्दी व ओळखचिन्हे, मेडल बनावट असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. गवळी यांनी याबाबत कोतवाली पोलिसांना कल्पना दिली. कोतवाली पोलिसांनी तोतया मेजरला ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव संजय विठोबा पाटील (वय- 45 रा. हातखंबा ता. जि. रत्नागिरी) असे सांगितले. त्याच्या जवळ सर्व काही बनावट असल्याने पोलिसांनी त्याची सखोल चौकशी सुरू केली. त्याच्या जवळ मिलिटरी ड्रेस, बॅग, ‘आर्मी सीडी’ असे लिहलेले एअर पिस्तूल, 10 हजारांची रोकड, बनावट ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, दोन महिलांच्या नावाचे मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, संजय विठोबा पाटील नावाचे पॅन कार्ड, बनावट शिक्के, पंजाब नॅशनल बँकेचे डेबिट कार्ड, आयसीआयसीआय बँकेचे डेबिट कार्ड, एचडीएफसी बँकेचे मास्टर कार्ड, स्टेट बँकचे डेबिट कार्ड, सेंट्रल बँकेचे डेबिट कार्ड, अ‍ॅक्सीस बँकेचे व्हिजा कार्ड, विविध कंपन्यांचे सीम कार्ड, पाच मोबाईल, 50 वर्षे सेवा पूर्ण झालेले सुवर्णजयंती पदक, वेगवेगळ्या इसमांचे पासपोर्ट, अनोळखी मिलिटरी अधिकारी असलेला पासपोर्ट असे 64 हजारांचे घबाड त्यांच्या जवळ सापडले.

तोतया मेजरने सहा महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील एका महिलेला मेजर असल्याचे भासवून तिच्यासोबत लग्न केले. गोडगोड बोलून तिचे 52 हजारांचे दागिने बँकेत गहाण ठेवले. असाच प्रताप त्याने धुळे जिल्ह्यातील एका महिलेसोबत केला. आर्मीमध्ये मेजर असल्याचे सांगितले. सहा महिने सुट्टीवर आलो आहे, असे भासवून तिच्यासोबत लग्न केले. तिचे दोन लाख 50 हजरांचे दागिने बँकेत गहाण टाकले. हा पठ्ठ्या तेवढ्यावर गप्प बसला नाही. त्याने धुळ्याच्या महिलेचे नातेवाईक असलेल्या चौघांना नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातला. चौघांकडून नोकरीसाठी मूळ व झेरॉक्स कागदपत्रे घेतले. तसेच, तीन लाख दोन हजार रुपये बँक खात्यावर भरायला लावले.

त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही नोकरी व पैसे मिळाले नाही. कोतवाली पोलिसांनी तोतया मेजरला पकडल्याचे कळताच त्यांनी पोलीस ठाणे गाठून सर्व हकिकत सांगितली. तसेच सुनील हिंगे नावाच्या व्यक्तीचे नोकरीसाठी दोन लाख दोन हजार रुपये घेत फसवणूक केली. संतोष साठे नावाच्या व्यक्तीकडून 43 हजार रूपये उसने घेतले. त्यांनी पैशाची मागणी केली असता, तुमच्या मुलाला नोकरीला लावून देतो असे सांगून त्यांची फसवणूक केली. आतापर्यंत या तोतयाने दोन महिला, सहा पुरुषांना आठ लाख, 49 हजार रुपयांना गंडा घातला आहे. या तोतयाने कोपरगाव तालुक्यातील ज्या महिलेसोबत लग्न केले होते. तिने काही मुलांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे, झेरॉक्स, बनावट शिक्के असे पोलिसांना दिले आहे. पोलिसांनी ते तपासासाठी जप्त केले आहे. सध्या हा तोतया मेजर न्यायालयीन कोठडीत असून अजून किती लोकांना त्याने गंडा घातला याचा पोलीस तपास करत आहेत.

खात्यावर 79 रुपये शिल्लक
पोलिसांनी तोतया मेजरकडून विविध बँकांचे डेबिट कार्ड, पासबुक जप्त केले आहेत. बँकेकडे पोलिसांनी त्याच्या खात्याबाबत चौकशी केली असता, फसवणूक झालेल्या लोकांच्या नावाने तोतयाच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे दिसून येते. मात्र, सध्या त्याचे सर्व खाते मिळून 79 रुपयांचा बॅक बॅलन्स आहे. यामुळे अनेकांची फसवणूक करून त्याने तो पैसा खर्च केला असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी ज्या महिलेसोबत त्याने फसवणूक करून लग्न केले, ती बँकेत गहाण टाकलेले दागिने मिळविण्यासाठी व त्याला सोडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!