नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

0

चौघांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – भिंगार येथील रासने कुटुंबातील व्यक्तींना पुण्याच्या खडकी येथील अ‍ॅम्युनेशन कारखान्यात नोकरीस लावून देतो असे सांगून, त्यांना बनावट नेमणुकीचे आदेश, ओळखपत्र देऊन किशोर गायकवाड यांच्यासह तिघांनी तीन लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी कविता रासने यांच्या फिर्यादीवरून या चौघांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भिंगारमधील ब्राह्मणगल्लीत राहणार्‍या किशोर रासने यांना किशोर गायकवाड, राहुल किशोर गायकवाड, रोहित किशोर गायकवाड (सर्व राहणार वडारवाडी, गौतमनगर, पाथर्डी रोड) आणि प्रवीण गाडे (रा. भिंगार) यांनी नोकरीचे आमिष दाखविले व त्यांची फसवणूक केली. यातील आरोपींनी रासने आणि अन्य साक्षीदार यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन पुण्यातील खडकी येथील अ‍ॅम्युनेशन कारखान्यात नोकरीस लावून देतो, असे आश्‍वासन दिले होते.

यासाठी तीन लाख 60 हजार रुपयांची रक्कम उकळण्यात आली होती. त्यानंतर खडकी येथील अ‍ॅम्युनेशन कारखान्याची बनावट नेमणूक ऑर्डर, कीट, ओळखपत्र दिले. रासने यांनी याची खात्री केली असता गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांनी फसवणूक केल्याचे उघड झाले. तेव्हा त्यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्राच्या   आधारे लष्कारात भरती  – उत्तरप्रदेशातील रायपूर येथील मुन्ना लाल कमलसिंग याने अशोककुमार या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून योगींदर पूर्ण नाव माहित नाही (रा. आग्रा) याच्या मदतीने नगरच्या एमआयआरसीमध्ये सैनिक म्हणून दाखल होत प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात आल्यानंतर एमआयआरसीच्यावतीने राजेश कुमार यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुन्ना व योगींदर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*