साईबाबा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापकीकेकडून फसवणूक

0

माहिती अधिकारात उघड, गुन्हा दाखल करण्याची माघाडे यांची मागणी

शिर्डी (प्रतिनिधी)- साईबाबा कन्या विद्या मंदिर या शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती जहाँआरा शहाबुद्दीन मिरजकर यांनी सन 2014-15 मध्ये अभिनव शिक्षण संस्थेचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आंबेगाव येथे नियमित विद्यार्थी म्हणून एम.एड.पूर्ण केल्याचे माहिती अधिकारातून उपलब्ध झाली. त्याचवेळी त्यांनी साईबाबा कन्या मंदिरात सहशिक्षक म्हणून काम केले असून शाळेच्या हजेरी रजिस्टर वर त्यांच्या सह्या असल्याचे माहिती अधिकारात सामाजिक कार्यकर्ते विकास माघाडे यांनी माहिती मागविल्यानंतर उघड झालेले आहे. त्यामुळे मिरजकर यांनी शाळा किंवा विद्यापीठ यापैकी एकाची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माघाडे यांनी केली आहे.
पुणे विद्यापीठाचे तरतूदीनुसार विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी 75 टक्केपेक्षा अधिक वर्गातील हजेरी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची 75 टक्केपेक्षा कमी हजेरी असल्यास विद्यापीठाच्या परीक्षेस प्रविष्ठ होता येत नाही.परंतु या शैक्षणिक वर्ष 2014-15 मधील जून 2014 ते मे 2015 या वर्षभर कालावधीत जहाँआरा मिरजकर यांनी श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर शिर्डी या शाळेतील हजेरी मस्टर वर सह्या केलेल्या आहेत. त्यांनी या कालावधीत संस्थानचा पूर्ण पगार घेतलेला आहे. त्याचवेळी सन 2014-15 मध्ये मिरजकर पुणे येथील अभिनव शिक्षण संस्थेचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आंबेगाव येथे नियमित एम.एड. विद्यार्थी म्हणून हजर आहेत आणि एम.एड. उतीर्ण झालेल्या आहेत. त्यांच्या एम.एड. उत्तीर्ण झाल्याची नोंद श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर शिर्डी या शाळेच्या हजेरी मस्टरवर घेण्यात आली आहे, असे सर्व विकास माघाडे यांनी पुणे विद्यापीठ व साईबाबा कन्या विद्या मंदिर शाळेतील मिरजकर यांची माहिती मागविल्यानंतर उघड झालेले आहेत.
मिरजकर वर्षभर एकाच वेळी, दर दिवशी शिर्डी व पुणे या दोन ठिकाणात 200 किलोमीटर अंतर असताना एकाचवेळी दोन्ही ठिकाणी कशा काय उपस्थित होत्या. मिरजकर यांनी श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर शिर्डी या शाळेत उपस्थित असतील तर त्यांनी शिक्षणशास्त्र महाविद्यालय आंबेगाव येथे डमी विद्यार्थीनी बसवून एम.एड.पूर्ण केले काय?, असा सवाल माघाडे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी मिरजकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे माघाडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*