हंगेवाडी ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार

0

उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती

आश्‍वी खुर्द (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील वंरवडी व चंदनापुरी येथील ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या घटना ताज्या असतानाच तालुक्यातील हंगेवाडी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक गंगाधर राऊत यांनी गैरव्यवहार केल्याचे माहिती अधिकारात सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण अंकुशराव कांगणे यांनी मिळविलेल्या माहितीमुळे उघड झाले आहे.
याबाबत डॉ. प्रवीण कांगणे यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर 8 जानेवारी रोजी तक्रार दाखल केल्यानतंर 22 फेब्रुवारीला ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या सचिव नीला रानडे यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश देत वरिष्ठ अधिकार्‍यांना चौकशीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
हंगेवाडी येथील ग्रामसेवकाने ठेकेदारास हाताशी धरून गावासाठी मजुंर विविध योजनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची माहिती डॉ. प्रवीण कांगणे यांनी माहिती अधिकारात उघड केल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरु असून चौकशी अहवाल प्राप्त होताच नेमकी आकडेवारी स्पष्ट होणार आहे. तर डॉ. कांगणे यांनी गैरव्यवहाराची यादी प्रसिद्धीस दिली आहे.
गावातील सास्कृंतिक भवनाचे काम 10 लाख रुपये दाखवले असून प्रत्यक्षात 2 ते 3 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे, गावात आंबेडकरनगर अस्तित्वात नसताना आंबेडकरनगर दाखवून दलित वस्ती सुधार योजनेतून रस्ता काँक्रिटीकरणाचे आठ लाखांचे काम दाखवत प्रत्यक्षात दोन लाखांचे काम करत माती मिश्रित रस्ता करण्यात आला आहे, मंजुरीचे ठिकाण एक तर कामाचे ठिकाण मात्र दुसरीकडेच दाखवत बिरोबा मंदिरासमोरील सभागृह खाजगी मालकीच्या जागेत बांधण्यात आले आहे.
ठक्कर बाप्पा विकास योजनेतील सभामंडपाचा निधी हडप करत त्या जागेवर लोकवर्गणीतून मंदिर बांधत वेगळयाच निधीतून काम केले असल्याचे नाव देण्यात आले. संगमनेर विधानसभा क्षेत्रातील निधी शिर्डी विधानसभा क्षेत्रात कशा प्रकारे आणला? तर दोन योजना मंजूर करत प्रत्यक्षात मात्र एक योजना राबवत दुसर्‍या योजनेतील निधी गैरव्यवहार केला आहे, बीआरजीएफ निधी, ग्राम निधी व 13 वा वित्त आयोग निधीत पेवर ब्लॉक बसविण्याच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार, गावातील स्मशानभूमीचे काम जन सुविधा योजनेतून व शेड लोकवर्गणीतून करण्यात आले असताना, वेगळयाच निधीतून केल्याचे फलक लावण्यात आला आहे.
अशाप्रकारे ग्रामसेवकाने ठेकेदाराला हाताशी धरून खोटी अंदाजपत्रके व मूल्यांकन करत निधी हाडप केला असल्याचा दावा डॉ. कांगणे यांनी करत या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली असून दोषी अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार संगमनेर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी डोखे यांची चौकशी कामी नेमणूक करण्यात आली होती. डोखे यांनी उच्चस्तरीय समितीला दिलेल्या अहवालात अनियमितता आढळल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असली तरी चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानतंर वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*