कामगारांच्या नावे बनावट सोने तारण ; सराफाकडून बँक व तरुणांची फसवणूक

0
बनावट व मिश्र सोने –
सराफाकडे आलेले बनावट व मिश्र सोने कोठून आले असा प्रश्‍न पडला असता हा मुद्देमाल ड्रॉपचा असल्याचे बोलले जात आहे. तसेच शहरात चेनस्नेचिंगच्या 184 घटना घडल्या आहेत. त्यातील फक्त 3 उघड झालेल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनी अशा प्रकारचे सोने सराफांना कमी किमतीत देऊन विक्री केल्याच्या घटना यापूर्वी उघड झाल्या आहेत. चौकशी झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघड होईल असे मत पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे.
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरातील एका सराफाने कामास मुले पाहिजेत, असे म्हणून तरुणांना कामावर घेतले होते. त्यांच्या नावे मिश्रित सोने बँकेत तारण ठेवून बँकेची व शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौकशी झाल्यानंतर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
शहरातील एक सराफाने त्याच्या दुकानावर कामास मुले पाहिजेत, अशी जाहिरात करुन काही बेरोजगार तरुणांना दुकानावर कामास ठेवले होते. अशा तरुणांच्या नावे एका बँकेत सोने तारण ठेवून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली होती. मात्र काही दिवसानंतर बँक अधिकार्‍यांनी या सोन्याची चौकशी केली असता त्यातील काही सोने बनावट व मिश्र निघाल्याचे अधिकार्‍यांच्या लक्षात आले. या बँक अधिकार्‍यांनी ज्या तरुणांच्या नावे सोने तारण आहे, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली.
मात्र हे सर्व तरुण या व्यवहाराबाबत अनभिज्ञ असल्याचे बँकेच्या लक्षात आले. मात्र कायदेशीरदृष्ट्या तरुणांच्या नावावर हे सोने असून त्यांच्याभोवती चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे तीन वर्षापूर्वी या सराफाकडे कामास असणार्‍या तरुणाला बँकेतून विचारणा झाली असता त्याने सर्व प्रकार उघड केला आहे. या घटनेत बँकेची फसवणूक झाल्यामुळे या प्रकरणावर पडदा पडणे शक्यतो अशक्य आहे. मात्र या घटनेची वाच्यता होऊ नये किंवा सराफाचे नाव पुढे येऊ नये यासाठी मोठी तडजोडीची भूमिका बाजावली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेत 110 तरुणांची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे. चौकशी, गुन्हे, बनावट सोने अशा विविध गोष्टींना सामोरे जायला नको म्हणून सराफाने या तरुणांशी अर्थपूर्ण तडजोडीची भाषा सुरू केली आहे. मात्र या घटनेशी काही एक संबंध नसताना बळेच आरोपी होण्यास तरुणांनी नकार दिला आहे. या घटनेची पोलखोल करुन चुकीच्या गुन्ह्यात अडकवू नये यासाठी फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा केली असून ते पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. या प्रकारामुळे सराफांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

LEAVE A REPLY

*