लाखोंचा शौचालय अनुदान घोटाळा

0
शिर्डी (प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत लाखो रूपयांचा शौचालय अनुदान घोटाळा नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अहमदनगर यांनी चौकशी करावी अशी मागणी कोर्‍हाळे ग्रामस्थांनी केली आहे.
प्रसिध्दीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून या योजनेच्या निकषानुसार नागरीकांना शौचालय उभारणीसाठी बारा हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे.
मात्र कोर्‍हाळे येथे ग्रामसेवक यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जुनीच शौचालय असतांना नवीन शौचालयाचे प्रस्ताव अहवाल तयार करून यंत्रणा राबवुन गटविकास अधिकारी यांचे स्तरावर मंजुरी घेऊन प्राप्त शौचालय मंजुरी यादीनुसार बहुतांशी नागरीकांनी शौचालय न बांधताच त्यांना या योजनेचा अतिरिक्त बोनस दिली आहे. राहात्याचे गटविकास अधिकारी यांचेकडे या शौचालय अनुदान प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तक्रारही केली होती. मात्र उगले यांनी संबंधीतांना वाचविणेच्या दृष्टीकोनातून कानाडोळा केला.
अद्यापही त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही. त्यात भरीस भर शौचालय तपासणीचे काम जि.प. शाळा कोर्‍हाळेचे मुख्याध्यापक यांचेकडे होते. शौचालये बांधलेले नसुन ते जुनेच दाखविले आहे. हे माहीत असुनही मुख्याध्यापक यांनी पंचायत समितीकडे सादर केलेल्य अहवालामध्येही बहुतांशी प्रमाणात गडबड केली आहे.
एकंदरीत या प्रकरणात मोठ्या प्रमाणात शौचालय अनुदान घोटाळा झाला असून त्याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करुन संबंधीतांवर कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रविण मुर्तडक, अनिल चांगले, योगेश कालेकर, उल्हास कालेकर, नवनाथ हेकरे, मयुर चांगले, रवि चांगले आदींच्या सह्यानिशी देेण्यात आला.

LEAVE A REPLY

*