लोणी सेवा सोसायटीचा गैरकारभार चव्हाट्यावर

0

महिलेच्या नावावर सचिव व तत्कालीन पदाधिकार्‍यांनी काढले परस्पर कर्ज

नाहाटांसह पंधरा जणांविरोधात अजामीनपात्र गुन्हा

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील सेवा सोसायटीमार्फत शेतकरी महिलेच्या नावावर 68 हजार रुपयांचे परस्पर कर्ज काढून संपूर्ण रक्कमेची विल्हेवाट लावली. या प्रकाराने फसवणूक झालेल्या महिलेच्या तक्रारीवरुन श्रीगोंदा पोलिसांनी संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी, सचिव व जिल्हा सहकारी बँकेच्या शाखाधिकारी यांच्याविरुध्द संगनमत करून फसवणूक व अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या गावातील संस्थेतच हा प्रकार घडल्याने त्यांच्या ‘लोणी’युक्त कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब नाहाटा हे या संस्थेचे संचालक असून आरोपींमध्ये संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्षांसह नाहाटा यांच्याही नावाचा समावेश आहे.
वंदना आप्पा काकडे (वय 27, रा. लोणी व्यंकनाथ) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी असून माझी 81 आर जमीन आहे. मी लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेची सभासद आहे. मात्र मी संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नव्हते. 5 सप्टेंबर 2017 रोजी मला पैशांची गरज भासल्याने शेतीवर कर्ज घेण्यासाठी लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेत गेले. तेथे गेल्यानंतर संस्थेचे सचिव बबन बाबा भागवत यांनी माझ्या जमिनीवर आधीच शेती कर्ज घेतले असल्याचे सांगितले.
अधिक चौकशी केली असता 5 फेब्रुवारी 2016 रोजी माझ्या संस्थेतील खात्यावर बनावट कागदपत्र बनवून कर्ज प्रकरण केल्याचे आणि सदरचा धनादेश खोट्या सह्या करून 68 हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे समजले. माझ्या ‘ड’ पावती, कर्जाच्या धनादेशावर अथवा कोणत्याही कागदपत्रांवर माझ्या सह्या नाहीत. माझ्या नावावर खोटे कर्ज प्रकरण करून संस्थेचे सचिव, अध्यक्ष व संचालक मंडळ तसेच जिल्हा सहकारी बँकेच्या मढेवडगाव शाखेचे शाखाधिकारी यांनी संगनमताने 68 हजार रुपयांच्या कर्जाचा स्वतःच्या फायद्याकरिता उपयोग केला.
वंदना काकडे यांनी श्रीगोंदा पोलिसांत दिलेल्या या फिर्यादीवरून लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक, संस्थेचे सचिव बबन बाबा भागवत आणि जिल्हा सहकारी बँकेच्या मढेवडगाव शाखेचे शाखाधिकारी यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.

दरम्यान, लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेतील बोगस कर्ज प्रकरणाच्या गंभीर प्रकारानंतर लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेच्या सर्व कर्ज व अन्य प्रकरणांची तत्काळ चौकशी करण्याची मागणी वंदना काकडे यांनी जिल्हा उपनिबंधक आणि साहाय्यक निबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बनावटीचा कबुली लेखी जबाब –
काकडे यांनी संस्थेत बोगस कर्ज प्रकरणाबाबत संस्थेचे सचिव बबन भागवत यांच्याकडे चौकशी केली. असता सचिव भागवत यांनी ‘ड’ पावती, धनादेश अथवा कोणत्याही कागदपत्रांवर काकडे यांच्या सह्या नसताना परस्पर कर्ज प्रकरण करून रक्कम काढल्याचे लेखी कबुली तक्रारदार काकडे यांना दिली. 

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न –
या गैरकारभाराविषयी पोलिसांत दाखल केलेली फिर्याद मागे घ्यावी, यासाठी तक्रारकर्त्यांना मोठ्या रकमेची लालच दाखवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा लोणी व्यंकनाथ आणि बेलवंडी परिसरात होत आहे. दरम्यान, काकडे यांनी तक्रार मागे घ्यावी, यासाठी पदाधिकार्‍यांनी काकडेंच्या नातेवाईकांकडून दबाव आणला जात असल्याचीही चर्चा आहे.

 

LEAVE A REPLY

*