हरवलेली कोमल व्हॉटस्अपने शोधली

0
नवीन नाशिक । अलिकडच्या काळात सोशल मीडिया हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. याच्या चांगल्या-वाईट परिणामांची उदाहरणे देखील आपल्याला अनुभवायला मिळतात. असेच एक चांगले उदाहरण शनिवारी (दि.14) नवीन नाशिककरांना विशेषत: सावतानगर येथील पाटील परिवाराला अनुभवायला मिळाले.

सावतानगर येथील चैतन्य हनुमान चौकातील चार वर्षांची चिमुरडी खेळता खेळता रस्ता चुकली आणि घरापासून दूर केली. रस्ता चुकल्याने भांबावलेली बालिका रडत असताना काही तरुणांनी तिला नाव, पत्ता विचारला असता तिने नाव कोमल सांगितले परंतु पत्ता तिला सांगता येत नव्हता.

अखेर एकनिष्ठ युवा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तिच्या घराचा शोध घेतला. मात्र तासभर शोधूनही तपास लागला नाही. त्यावेळी या तरुणांनी मुलीचा फोटो व्हॉटस्अप ग्रुपवर शेअर करून तिची माहिती टाकली. एकनिष्ठचे संस्थापक अध्यक्ष योगेश गांगुर्डे यांनी अखेरचा उपाय म्हणून कोमलला अंबड पोलीस ठाण्यात नेले.

त्या ठिकाणी अ‍ॅड. अतुल सानप यांनीही मुलीच्या फोटोसह पोस्ट सगळ्या ग्रुपवर टाकली. ही पोस्ट पाटील परिवाराशेजारी राहणार्‍या आकाश गोराणे याने बघितली व त्याने तात्काळ कोमलला ओळखले. त्याने तात्काळ योगेश गांगुर्डे यांच्याशी संपर्क साधून कोमल ही रिक्षाचालक विजय पाटील यांची मुलगी असल्याचे कळविले. इकडे घरी तिचा सर्वत्र शोध सुरू असताना फोनवरून कोमल सापडल्याची माहिती मिळताच कोमलची आई सोनाली पाटील, वडील विजय पाटील, काका योगेश पाटील व परिसरातील रहिवाशांचा जीव भांड्यात पडला.

सर्वांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले व कोमलला सांभाळणार्‍या महिला पोलीस शोभा भणगे यांनी कोमलला आईच्या स्वाधीन केले. यावेळी माय-लेकी एकमेकींच्या मीठित सामावल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.

LEAVE A REPLY

*