चार लाखांची बॅग पळविली

0

अपघाताचा बनाव करून चारचाकीची हेल्मेटने काच फोडली

दिवसाढवळ्या श्रीरामपूर – नेवासा रस्त्यावरील प्रकार

टाकळीभान (वार्ताहर)- श्रीरामपूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून येथील दूध संकलन केंद्र चालकाने दुधाच्या पगारासाठी काढलेल्या रक्कमेवर पाळत ठेवून पाठलाग करीत टाकळीभान नजीक गाडी थांबताच दोन दुचाकिवरून पाठलाग करणार्‍या चोरट्यांनी आपघाताचा बनाव करून हेल्मेटने चारचाकिची काच फोडून गर्दीचा फायदा घेत कार मधील 3 लाख 88 हजारांची बॅग घेऊन श्रीरामपूरच्या दिशेने पोबारा केला.याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

टाकळीभान येथील छत्रपती दूध संकलन केंद्राचे संचालक विश्वास (पांडू) सावळेराम कोकणे हे दुधाचे पेमेंट काढण्यासाठी श्रीरामपूर येथील स्टेट बँकेत आपल्या चारचाकी महेंद्रा लोगन क्र.एम.एच.17 ए.ए.0082 ने गेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते पैशाची बॅग घेऊन गाडीकडे आले असता गाडी उभी केलेल्या ठीकाणी त्यांच्या गाडीचे मागचे चाक पंक्चर केल्याचे त्यांना दिसून आले.टायर ट्युबलेस असल्याने तेथून निघून मोरगे हॉस्पिटलजवळ त्यांनी पंक्चर काढले व टाकळीभानकडे निघाले.सायंकाळी 5.30 च्या दरम्यान ते टाकळीभान येथील खंडागळे वस्तीजवळ आले असता कोहीनुर वेल्डिंग या दुकानात गाडी लॉक करून गेले.

पाठलाग करणार्‍या चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत रोडवर अपघाताचा बनाव केला.त्यातील एकाने गर्दीच्या विरुध्द बाजूने जाऊन डोक्यातील हेल्मेटसह काचेला धडक मारली व पैशाची बॅग पळविली. गर्दी कमी होताच कोकणे गाडीत बसले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.याबाबत टाकळीभान दूरक्षेत्रात खबर देण्यात आली. मात्र, गुन्हा नोंदविण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात जाण्याचे आदेश देण्यात आल्याने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.या घटनेबाबत ग्रामस्थांत दहशतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगार पोलिसांवर कडी करीत आसल्याची चर्चा होत होती.

LEAVE A REPLY

*