पंचवटी परिसरात गावठी कट्टा विक्री करणारे चौघे गजाआड

दिड लाखाचा मुद्देमाल जप्त

0

नाशिक | दि. ७ प्रतिनिधी- पंचवटी परिसरात गावठी कट्टा विक्री करण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघांच्या टोळक्याला पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून कट्टा, जीवंत ५ काडतुसे, रिक्षा तसेच इतर साहित्य असा दिड लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दिलीप तुळशीराम हंबीले (३१, साईनगर, पंचवटी), करण विश्‍वंभर मांजी (२६, हॉटेल स्वागत जवळ, मुळ वलांगीर, ओरीसा ), रामेश्‍वर शंकर कुमावत (३२, साईनाथनगर, जेलरोड), किशोर देविदास चव्हाण (३०, त्रिमुर्तीनगर, हिरावाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळ हद्दीतील ठक्कर मैदानालगत असलेल्या मोकळ्या जागेत काही व्यक्ती गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती म्हसरूळ पोलीसांना मिळाली होती. सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण, परिष्ठ पोलीस निरिखक सुभाषचंद्र देशमुख यांच्या पथकाने सदर परिसरातील बोरगडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावरी सापळा रचला होता.

 रिक्षा क्रमांक एमएच १५, झेड २९१६ ही संशयास्पद वाटल्याने पोलीसांनी रिक्षावर छापा टाकला असता रिक्षातच गावठी कट्‌ट्याचा व्यवहार करणारे चारही संशयीत पोलीसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून देशी बनावटीचा कट्टा, ५ जिवंत काडतुसे, चॉपर, दोन मोबाईल, रिक्षा असा एकुण १ लाख ४६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याप्रकरणी चौघांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वॉरंटवरील गुन्हेगार ताब्यात
आज कट्टा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयीत दिलीप तुळशीराम हंबीले हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. रिक्षातून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या बॅगमधून पैसे व किंमती वसतू लंपास करण्याचा त्याचा हातखंडा असून त्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

तो न्यायालयात सुनावणीस हजर राहत नसल्याने त्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. आणि तो आयताच पोलीसांच्या ताब्यात मिळाला आहे. त्याकडून अधिक गुन्ह्यांचा उलगडा होणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*