Type to search

Featured सार्वमत

माजी जि.प. सदस्य निघाला 75 लाख लुटीचा ‘मास्टर माईंड’

Share

दिलीप वाकचौरेला तीन दिवसांची पोलीस कोठडी लुटीतील 28 लाख वाकचौरेकडेच

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसीत सुट्ट्या नोटा देण्याच्या बहाण्याने 75 लाख रुपयांच्या लुटीमध्ये जिल्हा परिषदेचा माजी सदस्य दिलीप विठ्ठल वाकचौरे (रा. पुणतगाव, ता. नेवासा) हा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या प्रकरणात राजकीय पुढारीच सूत्रधार निघाल्याने खळबळ उडाली आहे.

दोन हजाराच्या बंध्या नोटा सुट्या करण्यासाठी 15 टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील कापूस व्यापारी चांगदेव अंबादास पवार यांच्याकडील 75 लाखांची रक्कम लुटण्यात आली. दि. 5 जुलै रोजी सायंकाळी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली.

पवार यांनी मंजूर कर्जाच्या रकमेतून हे पैसे आणले होेते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून राहुरी येथील कापूस व्यापारी सचिन व राहुल उदावंत यांच्यासह आठ जणांना यापूर्वीच अटक केली आहे. सध्या ते आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या घटनेतील आणखी सात आरोपींना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. शिवसेनेचा श्रीरामपूर तालुका उपप्रमुख रावजी उर्फ बिट्टू कृष्णा वायकर व त्याचा मेहुणा दीपक इंगळे यांना दिल्ली येथे तर बाउन्सर असलेल्या दत्ता मोहन पन्हाळे, आशिष योकोब खरात, अतुल जयसिंग जर्‍हाड, किरण काशिनाथ वेताळ यांना पुणे परिसरातून व सुनील सोपान नेमाणे याला श्रीरामपुरातून पोलिसांनी अटक केली.

वायकर याने दिलेल्या माहितीवरून जिल्हा परिषदेचा माजी सदस्य दिलीप वाकचौरे हा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात पुढे आले. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली. त्याने गेल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी केली होती. परंतु त्याचा पराभव झाला होता. लुटीतील 28 लाख रुपये त्याच्याकडे आहेत. लुट करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला काय सांगायचे, त्याच्याशी कसे बोलायचे, हे त्याने आरोपींना शिकविले.

त्यासाठी त्याने वायकर यांच्या कार्यालयात, चितळी व चोथाणी रुग्णालय परिसरात बैठका घेवून लुटीचा आराखडा तयार केला होता. या बाबी तपासात पुढे आल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले. आरोपी वायकर याच्यासह इतर सहा आरोपींना 25 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असून दिलीप वाकचौरे याला काल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे हजर केले असता त्याला तीन दिवस (दि.26 जुलै पर्यंत) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!