पूर्व वैमनस्यातून माजी सरपंचावर कुर्‍हाडीने हल्ला

0

पाथर्डी न्यायालयासमोर भरदुपारी घडला थरार; संशयित हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

पाथर्डी (प्रतिनिधी) – पाथर्डी बाजार समितीचे संचालक व माणिकदौंडीचे माजी सरपंच संपत गायकवाड यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून कुर्‍हाडीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला.
हा हल्ला काल शुक्रवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास पाथर्डी न्यायालयासमोर झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतले असून हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. 24 रोजी दुपारी पाथर्डी न्यायालयासमोर कल्याण-विशापट्टण्म महामार्गावर माणिकदौंडीचे माजी सरपंच व पाथर्डी बाजार समितीचे संचालक संपत गायकवाड कामानिमित्त आले होते. संपत गायकवाड यांना पहाताच एका जणाने हातातील मिरची पूड गायकवाड यांच्या डोळ्यात फेकली.
यामुळे गायकवाड जमिनीवर पडले. ते जमिनीवर पडताच त्या इसमाने हातातील कुर्‍हाडीने संपत गायकवाड यांच्या डोक्यात घाव घातला. डोक्याला कुर्‍हाडीचा मार बसल्यानंतर गायकवाड जमिनीवर पडले. यातूनही ते सावरत जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात मदतीसाठी धावले. त्यांच्या पाठीमागे हल्ला करणारा इसमही पोलीस ठाण्यात दाखल झाला.
पाथर्डी पोलीस ठाण्यात संपत गायकवाड आले असता त्यांना तातडीने खासगी वाहनाने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी हल्ला करणार्‍या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. संपत गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सिनेस्टाईल झालेला हल्ला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
जखमी अवस्थेत संपत गायकवाड पोलीस ठाण्यात आले असता तेथेही रक्ताचा मोठा सडा पडलेला होता. याप्रकरणी एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र,रात्री उशिरा पर्यंत कोणावरही गुन्हा दाखल केला नव्हता. जखमी संपत गायकवाड यांच्या जबाबावरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

वाहने नादुरुस्त –
पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन वाहने आहेत. मात्र ही वाहने नादुरुस्त असल्याने जखमी संपत गायकवाड यांना खासगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस ठाण्यात असलेली वाहने नादुरुस्त असल्याने पोलीस कर्मचार्‍यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. किरकोळ दुरुस्तीअभावी ही वाहने पोलीस ठाण्यात पडून असल्याने या वाहनांची तातडीने दुरुस्ती करून कामात सूसुत्रता आणावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*