राजीव राजळे अनंतात विलीन

0

तडफदार, दिलखुलास नेतृत्व ऐन तारुण्यात हरपले : अनेकांची भावना अनावर

पाथर्डी (प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्याचे सुपुत्र, लोकनेते, उत्कृष्ट संसदपटू माजी आमदार राजीव राजळे यांच्या पार्थिवावर कासार पिंपळगाव येथील दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात काल रविवारी दुपारी 3. 30 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवास मुलगा कृष्णा व लहान भाऊ राहुल यांनी मुखाग्नी दिला. त्यांच्या निधनाने एक तडफदार, दिलखुलास नेतृत्व ऐन तारुण्यात हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त झाली.

राजीव राजळे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना शनिवारी रात्री 10.30 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती कळताच तालुक्यासह जिल्ह्यात शोकाकूल वातावरण पसरले. अनेकांनी रात्रीच कासार पिंपळगाव येथे धाव घेत दुःख व्यक्त केले. तर त्यांच्या अंत्यविधीसाठी कार्यकर्ते व कारखाना प्रशासनाच्यावतीने दादा पाटील राजळे प्रांगणात रात्रीपासूनच नियोजन सुरू करण्यात आले. अंत्यविधीसाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ना. पंकजा मुंडे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, ना. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, खा.सदाशिव लोखंडे यांच्यासह तालुका व संपूर्ण जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते व स्नेहीजन उपस्थित होते.

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचे पती राजीव राजळे यांचे पार्थिव सकाळी 8 वाजता कासार पिंपळगाव येथील सिद्धसावली या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी सकाळपासूनच अनेकांनी गर्दी केली होती. दुपारी 4.30 वाजता अंत्यविधीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा एक तास अगोदरच अंत्यविधीची तयारी करण्यात आली. सिद्धसावली येथून त्यांचे पार्थिव फुलाने सजविलेल्या ट्रकमधून वृद्धेश्वर कारखाना मार्गे दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आले. यावेळी कार्यकर्ते, ‘अमर रहे, अमर रहे राजीव राजळे अमर रहे’च्या घोषणा देत होते. सुमारे 3.30 वाजता नियोजित अंत्यविधीच्या ठिकाणी पार्थीव आणण्यात आले.

अंत्यसंस्कारासाठी दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात चौथरा उभारून फुलांनी सजविला होता. अंत्यविधीसाठी वरुणराजानेही अल्पशी हजेरी लावली. भर पावसात कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी उभे होते.

यावेळी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, नगर जिल्ह्यातील तडफदार, अभ्यासू व कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने सार्वजनिक जीवनात मोठी हानी झाली आहे. विधिमंडळातील त्यांची कारकीर्द प्रभावी व लक्षवेधी ठरली. बोलण्याला धार व स्पष्टवक्तेपणामुळे त्यांची वेगळी छाप समाजमनावर राहिली आहे.

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, राजळे यांच्या निधनाचे वृत्त कळताच कानावर विश्वास बसला नाही. दोन दिवसांपूर्वी दवाखान्यात भेटायला गेले होते. शांत, संयमी, अभ्यासू व अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व म्हणून राज्यात राजीव राजळेंनी अल्पावधीत नाव कमवले. घरातील कर्ता माणूस गेल्यावर पूर्ण घर कोसळले. राजळे कुटुंबाला प्रचंड दुःख झाले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे, अप्पासाहेब राजळे, राजीव राजळे, डोणगावकर कुटुंबीय असे सर्वांचे स्नेहाचे संबंध होते. एक मंत्री या नात्याने शासनाचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वतीने राजळे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून आमदार मोनिका राजळे यांना ईश्वर दुःख पचवण्याची शक्ती देवो.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, राजीव राजळेंच्या जाण्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचा राजकीय वर्तुळात सर्वत्र आदर होता. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत विविध क्षेत्रांत केलेल्या कार्यामुळे त्यांचे नाव राजकारणात कोरले गेले.

खासदार दिलीप गांधी म्हणाले, राजळे यांच्या अकाली निधनाने जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीने व उत्तम वक्तृत्वाने नव्या पिढीपुढे त्यांनी चांगला आदर्श निर्माण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करून राजळे यांचे कार्य आमदार मोनिका राजळे यांनी पुढे चालवावे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, माजी आ. पांडुरंग अभंग, तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, डी. एम. कांबळे, माजी आ. जयंत ससाणे, बाबसाहेब दिघे, सचिन गुजर, माजी आ. साहेबराव दरेकर, अतुल चौधरी, शरद झोडगे, वाय. डी. कोल्हे, नानसाहेब तुवर, बाळासाहेब देशपांडे, शकूरभाई शेख, बाबा आरगडे, बन्सी सातपुते, शशिकांत गाडे, योगीराज गाडे, अजय फटांगरे, प्राजक्त तनपुरे, विठ्ठलराव लंघे, संतोष भागवत, जालिंदर वाकचौरे, दिनकर महाराज आंचवले, आदिनाथ महाराज आंधळे, भोसले महाराज, सदाशिव गायके, संपतराव म्हस्के, लहू कानडे, झिरपे महाराज, बाळासाहेब हराळ, दिलीप शिंदे, विलास औताडे, अविनाश मंत्री, सुरेश लगड, नानसाहेब फाटके, मधुकर साळवे, कचरू चोथे, अ‍ॅड. कांताराव औटी, अय्युब सय्यद, उबेद शेख, अभय आव्हाड, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, अशोक गायकवाड, सतीश सोनवणे, संजय कळमकर, बाळासाहेब साळुंके, बाळासाहेब शिंदे, प्रमोद भावसार, रामनाथ राजपुरे, जे. बी. वांढेकर, कृषिराज टकले, चंद्रकांत म्हस्के, मिठूभाई शेख आदींनी श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, रामदास कदम, आ. आर. टी. देशमुख, विजय गोल्हार, बाबसाहेब भोस, घनश्याम शेलार, डॉ. दीपक, दिलीपराव लांडे, आमदार विजय औटी, कैलास वाकचौरे, दीप चव्हाण, आमदार संगीता ठोंबरे, माजी आमदार शंकरराव गडाख, सत्यजित तांबे, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे, सोलापूरचे आयुक्त अविनाश ढाकणे, अतुल चौधरी (पुणे), शनिशिंगणापूर देवस्थानचे अध्यक्ष अप्पासाहेब शेटे, राजेंद्र नागवडे, ज्ञानेश्वर वाघचौरे (गंगापूर), अमर काळे, ना. जयकुमार रावळ, सोमनाथ खेडकर, विष्णुपंत अकोलकर, सुनील ओहोळ, बजरंग घोडके, प्रसाद आव्हाड, अमोल गर्जे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, विजय मंडलेचा, मुंकुंद गर्जे, संजय बडे, सभापती चंद्रकला खेडकर, सुरेखा ढाकणे, सुभाष केकाण, उद्धवराव वाघ, पुरुषोत्तम आठरे, अनिल कराळे, पांडुरंग खेडकर, सुभाष ताठे, माणिक खेडकर, धनंजय बडे, सुनील परदेशी, भगवान आव्हाड, किसन आव्हाड, भगवान दराडे, रामनाथ बंग, अरुण मुंडे, अशोक आहुजा, पांडुरंग पालवे, सुधाकर भवार, नारायणराव काकडे, दिनेश लव्हाट, नितीन दहिवाळकर आदींसह जिल्ह्याच्या सहकार, शैक्षणिक, सामाजिक, औद्यागिक, सांस्कृतिक, क्षेत्रांसह शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून अंत्यदर्शन घेतले.

 

 

LEAVE A REPLY

*