श्रद्धांजली (माजी आमदार राजीव राजळे) : अनादी मी! अनंत मी! अवध्य मी!

0
अनादी मी! अनंत मी! अवध्य मी! राजीव अप्पासाहेब राजळे या मनस्वी माणसाने जगाला करून दिलेली ही स्वत:ची ओळख! फेसबुक पेजवर भेटणारी. ज्याचा भूतकाळ शोधता येत नाही, ज्याला अंत नाही आणि ज्याचा वधही होऊ शकत नाही, हा या वाक्याचा अर्थ! काही वर्षांपूर्वी ते वाचताना ‘राजाभाऊ’ समजण्याचा प्रयत्न करून पाहिला…आणि आज तेच वाक्य वाचताना माझ्यासह त्यांच्या असंख्य मित्रांना गलबलून आले!
राजाभाऊने उठावे, खळखळून हसावे आणि हातावर टाळी द्यावी, अशी भावना त्यांनी आयुष्यात जोडलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात दाटून आली होती. रविवारी सायंकाळी राजाभाऊंचे शरीर अग्नीच्या स्वाधीन केल्यानंतरही अनेकांच्या झुंडी जागीच घुटमळत होत्या. राजाभाऊ आपल्यातून गेले, हे अस्वस्थ नजरा मान्यच करीत नव्हत्या!
नगर जिल्ह्याच्या राजकारणाला लाभलेले हे उमदे नेतृत्व. अभ्यासू, कल्पनाशील, व्यासंगी, स्पष्टवक्ते, हळवे आणि कमालीचे स्वप्नाळू! वयाच्या तिशीत राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाथर्डी मतदारसंघात 1999च्या आमदारकीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर या लढवय्या माणसाने वयाच्या 34 व्या वर्षी, 2004 मध्ये त्याच मतदारसंघातून आमदारकी जिंकली होती. यातच खरे तर त्यांचा आवाका दडलेला! पण का कोणास ठाऊक, त्यांचा हाच वेग नियतीला मान्य नसावा. पुढे हा वेग मंदावला आणि आज थांबला!
व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या राजाभाऊंचे सामाजिक गणितही कायम बेरजेचं! माणसे जोडण्याचा छंद. राज्यभर पसरलेल्या मित्रपरिवाराची मोठी शिल्लक ते आज मागे सोडून गेले आहेत. काहींच्या दृष्टीने राजाभाऊ फटकळ होते. तरीही या माणसाच्या अवतीभोवती माणसे का गोळा व्हायची? याचे उत्तर कदाचित त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दडलेले असावे! प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक स्वतंत्र आणि अभ्यासपूर्ण दृष्टी त्यांनी विकसित केली होती.
हीच दृष्टी ते पहिल्यांदा आमदार झाले, त्यावेळी सभागृहात झळकली. बेरोजगारी, अर्थकारण, नागरीकरण, बांधकाम आदी विषयांवर आपली मते मांडण्याची त्यांची हातोटी कमालीची होती. त्यांची भाषणे ऐकूण ज्येष्ठ नेते शरद पवार, स्व. विलासराव देशमुख यांच्यासारखी माणसे प्रभावित झाली होती! अपेक्षांचे ओझे वाढले ते याच काळात. तरुण राजकारणाचे प्रतीक म्हणून राजाभाऊ ठसठशीतपणे समोर आले, तो हा काळ!
विकासाची नवी कल्पना मांडण्यात त्यांची हातोटी पुढेही अनेकदा दिसली! पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये विधानसभा आणि दक्षिण लोकसभा निवडणूक त्यांनी लढविली. अपयश हाती आले, तरीही पहिल्या निवडणुकीच्या उत्साहानेच ते 2014च्या लोकसभेच्या आखाड्यात उतरले! त्यांच्याशी माझी भेट याच काळातील.
जेव्हा, केव्हा त्यांची भेट व्हायची तेव्हा त्यांच्या विकासविषयक कल्पना अचंबित करत. शेती, सिंचन, नगरचा विकास, रोजगार निर्मिती, उद्योगवाढ अशा अनेक अंगाने त्यांनी विपुल अभ्यास केला होता. व्यवस्थेचे वर्णन ’इंजिन खटारा आणि दिसायला जग्वार’ असे करताना यावरचे उपायही ते सांगायचे! म्हणूनच त्यांनी खासदार व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती; पण ते घडले नाही. आजही त्यांची एक सविस्तर मुलाखत त्यांच्या फेसबुक पेजवर आहे. त्यातून राजाभाऊ नावाचा माणूस नेमका कोण होता, याचा अदमास घेता येतो.
हॉलिवूड चित्रपट, इमारतींचे डिझाईन, तंत्रज्ञानातील विकास, आरोग्य क्षेत्रातील संशोधने यावरही राजाभाऊ भरभरून बोलायचे. एकाचवेळी शेताच्या बांधापासून अवकाशयानाच्या तंत्रज्ञानापर्यंतच्या ज्ञानासाठी आग्रही असलेला हा उमदा नेता म्हणूनच वेगळा वाटायचा!
राजाभाऊंना घरातून राजकारणाची परंपरा मिळाली होती; पण चौकटीत अडकणे त्यांना कधी मानवले नाही. त्यांच्या राजकीय वाटचालीत याचा प्रत्यय वारंवार आला. बंडखोरी हा गुणही त्यांनी अंगी बाणला होता. त्यामुळेच अफलातून कल्पनांना जन्म देण्याचे बळ त्यांना मिळत असावे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी भरवलेला बुकफेस्ट राज्यभर दखलपात्र ठरला. योजना आखायची आणि त्यावर काटेकोर अंमलबजावणी करायची, या स्वभावाला त्यांच्यातील बंडखोरी इंधन पुरवत होती.
अनेकांना उमेद देणारा हा माणूस आजाराशी लढताना उमेद हरला, हे मनाला चटका लावणारे आहे. त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत काय कमावले, काय गमावले याची गोळाबेरीज करण्यात आता अर्थ नाही. एक उमदा तरुण नेता अर्ध्यावर डाव सोडून गेला, हे जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच घडले आहे. नियतीने केवळ राजभाऊंवर अन्याय केला नाही. तर या जिल्ह्यातील राजकारणावर, समाजकारणावर आणि नवे स्वप्न डोळ्यात साठवून समाजासाठी काही करू पाहणार्‍या प्रत्येकावर अन्याय केला आहे!
अलविदा राजाभाऊ!!!

-अनंत पाटील,
कार्यकारी संपादक.

 

LEAVE A REPLY

*