माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशकात; पक्ष संघटना बांधणीवर लक्ष; तालुकानिहाय घेणार आढावा

0

नाशिक ।  गेल्या अनेक निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा बळकटी देण्याकरीता राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित केले असून आज नाशिक येथे त्यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या आढावा बैठका घेत आहेत. दि. 12 जुलै पासून उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा दौरा सुरु आहे. या दौर्‍यांतर्गत नाशिक जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उद्या शनिवार दि.15 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत नाशिक येथील तूपसाखरे लॉन्स येथे पक्षाचे विविध फ्रंटल व सेलच्या आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच यावेळी आयोजीत मेळाव्यास ते संबोधित करणार आहेत. संघर्ष यात्रेनिमित्त पवार, तटकरे जिल्हा दौरयावर आले होते. यानंतर 21 एप्रिल रोजी राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी नाशकात येउन पक्षाचा आढावा घेतला होता. याच धर्तीवर आगामी निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून तसेच पक्ष संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित करत राज्यभरात जिल्हानिहाय बैठका , मेळावे सुरू केले आहे. नाशिक जिल्हयाचे नेते छगन भुजबळ हे तुरूंगात असल्याने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. त्यातच पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने पक्ष अडचणीत सापडला आहे. त्यामूळे पक्षाला पुन्हा उभारी देण्याच्या दृष्टीने या मेळाव्याकडे पाहीले जात आहे.

मेळाव्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्यासमवेत महीला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ , युवक अध्यक्ष संग्राम कोते पाटील , सामाजीक न्याय विभागाचे अध्यक्ष आ. जयदेव गायकवाड , ओबीसी सेलचे अध्यक्ष इश्वर बालबुध्दे , राष्ट्रवादी युवती अध्यक्षा स्मिता पाटील आदि मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

*