महापालिकेकडून अनाधिकृत होर्डींग्जवर कारवाईचा फार्स

नोटीसा १५८ कारवाई १ होर्डीगवर ; जाहीरात धोरण प्रलंबीत

0
नाशिक | दि.९ प्रतिनिधी- महापालिकेच्यावतीने मागील पंचवार्षिक काळात अनाधिकृत होर्डीग व एकुणच होर्डीग्जचा सर्व्हे केल्यानंतर शहरात खाजगी जागेवर १५८ ठिकाणी खाजगी जागेवर अनाधिकृत होर्डीग असल्याचे समोर आले. या सर्व अनाधिकृत होर्डीग्जला महापालिकेने एक महिन्यापुर्वीच नोटीसा दिल्या आहे. मात्र केवळ एकच होर्डीगवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे होर्डीगवरील कारवाईचा फार्स केला जातो का, असा प्रश्‍न आता शहरात उपस्थित केला जात आहे.

महापालिकेने गेल्या महिन्यात शहरात खाजगी जागांवर असलेल्या १५८ मोठ्या होर्डीगला नोटीसा देण्याचे काम अतिक्रमण विभाग व नगररचना विभागाकडुन करण्यात आले आहे. महापालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडविणार्‍यांवर कारवाईसाठी प्रशासनाने नोटीसा बजावण्याचे काम केले. मात्र मुदत संपुनही संबंधीतांवर कारवाई करण्यात आली नाही. केवळ आज शहरातील महात्मानगर भागातील एबीबी सर्कल भागातील एक अनाधिकृत होर्डीग तोडण्याचे काम केले.

ही कारवाई नाशिक पश्चिम विभागातील आडगांवकर प्लाझा ए.बी.बी. सर्कल त्रंबकरोड येथे करण्यात आली. याठिकाणी उभारण्यात आलेले २० मी. बाय १० मी. मापाचे अनधिकृत होर्डींग हटविण्यात आले. यात ६ ट्रक लोखंडी अँगल व गर्डर जप्त करण्यात आले. मात्र अतिक्रमण विभागाने नोटीसा देऊनही केवळ आजपर्यत एकच कारवाई केल्याने याकडे संशयाने पाहिले जात आहे. शहरात उर्वरित १५७ होर्डीगवर अद्यापही कारवाई झालेली नसल्याने हा कारवाईचा फार्स तर नाही ना ? असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

महापालिकेला जाहीरात होर्डीगद्वारे मिळणारे उत्पन्न काही लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे मागील पंचवार्षिक काळात माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी शहरातील संपुर्ण जाहीरात फलक व होर्डीगचा सर्व्हे करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर पुण्याच्या धर्तीवर नाशिक शहरात जाहीरात व होर्डीगला कर लावण्याचा प्रस्ताव व धोरण मंजुर करण्याचे काम देखील झाले.

त्यानंतर शासन मंजुरीसाठी हा प्रस्ताव – धोरण शासनाकडे पडुन आहे. महापालिकेला जाहीरातीच्या माध्यमातून अल्प उत्पन्न मिळत आहे. आता महापालिकेत भाजपाची सत्ता आली असुन राज्याचा मुख्यमंत्री भाजपाचा आहे. त्यामुळे आता शासनाकडुन प्रलंबीत जाहीरात धोरण देखील तात्काळ मंजुर करुन घ्यावेत अशी मागणी नाशिककरांकडुन केली जात आहे.

LEAVE A REPLY

*