Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पावसामुळे फुलं कोमेजली; ऐन दिवाळीच्या तोंडावर फुलबाजार पडला

Share

नाशिक | प्रतिनिधी

संपन्नता आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या झेंडूच्या फुलांचा बाजार पडल्यामुळे फुले कोमेजली आहेत. दोन ते तीन महिने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या फुलांनी निराशा केल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. आज चांदवडच्या  बाजारात अवघ्या पाच पैसे शेकड्यानेही कोणा व्यापाऱ्याने फुले विकत घेतली नाहीत. त्यामुळे मातीमोल भावात अक्षरश: बळजबरीने फुले विकून पदरी निराशा पडलेल्या शेतकऱ्यांच्या दिवाळीवर विरजण पडले आहे.

बदललेल्या हवामानातही शेतात जपून वाढवलेल्या फुलांचे मार्केट दसऱ्याला चांगले होते. तेव्हा दोन पैसे शेतकऱ्याच्या हातात पडली. मात्र, दसऱ्यानंतर अनेक भागात पावसाने हजेरी लावली, फुले वातावरणामुळे कोमेजली. जी फुले चांगली होती त्यांना शेतकऱ्यांनी त्यांच्यावरील पाणी काढून, प्रकाश देऊन ती बाजारात दाखल केली, मात्र व्यापाऱ्यांनी ही फुलं घ्यायला नकार दिला. बळजबरीने दिली तरी कोणीही या फुलांना घेत नव्हते.

एका शेतकऱ्याने कल्याणला फुले विक्रीसाठी पिकअप नेली होती, यादरम्यान कल्याणमध्ये फुलांची आवक अधिक झाल्याने फुले विक्री होत असल्याची माहिती त्यास मिळाली दरम्यान या शेतकऱ्याने सर्व फुले कसारा घाटातील एका दरीत फेकून देत घराची वाट धरली.

जिल्ह्याच्या ठिकाणी फुलांना लक्ष्मीपूजनाला अधिक मागणी असल्यामुळे तालुक्यातील ठिकाणी अनेक व्यापारी फुले शेतकऱ्यांकडून विकत घेतात. ही फुलं पुढे जिल्ह्याच्या बाजारपेठेत दाखल होतात. शेतकरी हा झेंडू ट्रोलीवर विक्री करतो, एका ट्रोलीमध्ये जवळपास पाच ते सात क्विंटल फुले असतात. खेडेगावातून ट्रोलीला १२०० रुपयांचे भाडे लागते. शेतकऱ्यांना आज चांदवडच्या बाजारपेठेत अवघ्या चारशे ते पाचशे रुपये ट्रोलीप्रमाणे फुले विक्री करावी लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच अश्रू तरळताना दिसल्याने फुलबाजार पूर्णपणे कोसळल्याने शेतकरी वर्गात दुःखाचे वातावरण आहे.


कर्जबाजारी झालो

आजपासून चांदवडमध्ये फुलांचा बाजार भरण्यास सुरुवात झाली. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वाढवलेल्या झेंडूच्या फुलांनी निराशा केली. बि-बियाणे, मजुरी मेहनत, खत खाद्याचा विचार केला तर झेंडूमुळे हातीपदरी असलेले भांडवल लावून कर्जबाजारी झालो आहे. १२०० रुपये गावाहून मार्केटला यायला भाडे लागते. मजुरी तीन हजारापर्यंत येते आणि अवघ्या सहाशे रुपयांत ट्रोली कशी विक्री करावी असा प्रश्न पडतो. कोणी घेत नाही म्हणून बळजबरीने झेंडू आज विक्री करावा लागला.

संपत जोरे, शिरसाणे, ता. चांदवड


भाववाढीची अपेक्षा कायम 

दोन ते तीन महिने झेंडू तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवला. मजुरी भरमसाट वाढली आहे तरीदेखील चांगला भाव मिळाला तर रब्बीच्या लागवडीसाठी भांडवल मिळेल या उद्देशाने फुले तोडून विक्रीला नेली. मात्र, बाजारसमितीमध्ये व्यापारी फुलं घेत नाही. पावसामुळे फुलं ओली झाली आहेत. दसरा दिवाळी पर्यंतच या फुलांना मागणी असल्याने आहेत त्या परिस्थितीत फुलं तोडून बाजारात आणली आहेत. भाव वाढवा अशी आशा अजूनही कायम आहे.

सचिन देशमाने, शेतकरी, शिरसाणे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!